नागपूर : राज्यातील अनेक भागात आजही स्मार्ट प्रीपेड मीटरला नागरिकांसह विविध संघटनांचा विरोध आहे. त्यानंतरही ग्राहकांकडे हे मीटर बसवले जात आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात वर्षभरात सुमारे ६६ हजार ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर हे टीओडी मीटरच्या नावावर बसवले गेले. या युक्तीबाबत आपण जाणून घेऊ या.
केंद्राच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ निर्देशांकानुसार ग्राहक सेवा प्रदान करताना, महावितरणच्या नागपूर परिमंडळाने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ६६ हजार ४२२ लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली . या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना मागील वर्षभरात नागपूर शहर मंडळातील ३८ हजार ७६६, नागपूर ग्रामीण मंडळातील १८ हजार १२६ आणि वर्धा मंडळातील ९ हजार ५३० लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. यात नागपूर जिल्ह्यात ५६ हजार ८९२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान महावितरणने नवीन वीज जोडणी देतांना टीओडी मीटरच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महावितरणच्या या सगळ्याच ग्राहकांकडे नवीन मीटर बसले आहे. त्यामुळे या मीटरला विरोध असतांनाही नवीन जोडणीमध्ये हेच मीटर घ्यावे लागले.
काँग्रेसनगर भागात सर्वाधिक मीटर
नागपुरातील सर्वाधिक ११ हजार ८०१ वीज जोडण्या या कॉग्रेसनगर विभागात तर त्याखालोखाल मौदा विभागात ८ हजार ५८७, बुटीबोरी विभागात ७ हजार ४८२, महाल विभागात ७ हजार २६२, सिव्हील लाईन्स विभागात ७ हजार २३, गांधीबाग विभागात ५ हजार १९८, सावनेर विभागात ३ हजर ९४२, उमरेड विभागात ३ हजार ३३९ तर काटोल विभागात २ हजार २४८ वीज जोडण्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात देण्यात आलेल्या ९ हजार ५३० नवीन वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक ४ हजार ६०५ वीज जोडण्या वर्धा विभागात तर त्याखालोखाल हिंगणघाट विभागात २ हजार ६४१ तर आर्वी विभागात २ हजार २४१ नवीन लघुदाब वीज जोडण्या देण्यात आल्या.
सर्वाधिक मीटर घरगुती ग्राहकांकडे
महावितरणने दिलेल्या ६६ हजार ४२२ नवीन लघुदाब वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक ५३ हजार १३७ या घरगुती वीज जोडण्या असून यात नागपूर शहर मंडलातील ३१ हजार ३४१, नागपूर ग्रामीण मंडलातील १४ हजार ८४० तर वर्धा मंडलातील ६ हजात ९५८ वीज जोडण्यांचा समावेश आहे. याशिवाय परिमंडळात ९ हजार ६३५ वाणिज्यिक, १ हजार २०३ औद्योगिक आणि २ हजार ४४७ इतर वीज जोडण्या देण्यात आल्या. त्यामुळे सर्वाधिक मीटर घरगुती ग्राहकांकडे लागले.
