नागपूर: पती- पत्नीतील विश्वासाचा नात्याला तडा देणारी घटना मंगळवारी शहरातल्या मध्यवर्ती भागात उघडकीस आली. एकीसोबत अग्नीच्या साक्षीने सात जन्मापर्यंत साथ देईल, अशा आणाभाका घेतलेल्या पतीने दुसरीसोबतच सूत जुळवत विवाहबाह्य संबंध ठेवले. यातून दोन्ही महिलांना अंधारात ठेवत गुपचूप विवाह देखील उरकला. अखेर दुसऱ्या पत्नीला त्याच्या पहिल्या विवाहाची कुणकूण लागली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठत विश्वासघातकी पतीला कायद्याचा हिसका दाखवला. विवाह संस्थेला कलंक लावणारी ही धक्कादायक घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

पहिल्या विवाहाची माहिती लपवली

तरुणाने नोकरदार महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यापासून पहिल्या विवाहाची माहिती लपवून ठेवली. मुलीशी लग्न करताना त्याने आपला सगळा इतिहासच दडवून ठेवला. दरम्यान आपण याची दुसरी पत्नी असून यापूर्वी त्याने आणखी एकीला फसवल्याचे सत्य समोर येताच दुसरी पत्नी पूर्णपणे हादरून गेली. तीने थेट इमामवाडा पोलीस ठाणे गाठत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र तोवर दोन्ही पत्नीला अंधारात ठेवणारा नराधम पसार झाला.

पतीविरूध पोलिसांकडे धाव

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वकर्मा नगरमध्ये राहणाऱ्या आणि व्यवसायाने लेखापाल असलेल्या २९ वर्षीय पीडित महिलेने पतीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, २८ वर्षीय आरोपी अजित महावीर जैन हा औषध प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्याने अविवाहित असल्याचे खोटे सांगून मे २०२५ मध्ये आपल्याशी विवाह केला. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात सर्व काही सुरळीत वाटत होते; मात्र, कालांतराने त्याच्या वर्तनात बदल होऊ लागला.

अनेक दिवस तो घराबाहेर राहू लागला. दौऱ्याचे बहाणे करत तो आठ आठ दिवस बेपत्ता रहायचा. या काळात पीडित महिलेला अनोळखी क्रमांकांवरून सतत फोन येऊ लागले, त्यामुळे दुसऱ्या पत्नीला संशय आला. जेव्हा तिने स्वतःहून या प्रकरणाचा शोध घेतला असता धक्कादायक सत्य तिला कळले. त्यामुळे पिडीता पूर्णपणे सुन्न झाली. अजितचा यापूर्वीच विवाह झाला होता आणि त्याची पहिली पत्नी चंद्रपूर येथे राहते, अशी माहिती पिडितेला कळाली. त्याने पहिल्या पत्नीपासूनही हा विवाह आणि प्रेमसंबंध लपवून ठेवल्याचे आणखी एक सत्य पिडितेच्या लक्षात आले.

अजित जैन याने केलेल्या विश्वासघाताच्या कृत्यामुळे खोलवर दुखावल्या गेलेल्या पीडितेने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत कायदेशीर मदत मागितली. इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस फरार झालेल्या अजित जैनचा शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.