नागपूर : माणसाच्या मृत्यूनंतर कावळ्याला घास घालण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. मात्र, नागपुरातील रामनगर परिसरात याच्या अगदी उलट प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने कावळ्याला पकडून सायकलच्या कॅरिअरमध्ये अडकवले होते. हा कावळा घरी नेऊन खाणार असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितल्याचा दावा पक्षिप्रेमींनी केला आहे. विशेष म्हणजे, कावळा कॅरिअरमध्ये अडकवलेला असतानाच त्याचे पंख तोडले जात असल्याचेही पक्षिप्रेमींच्या निदर्शनास आले. वेळीच हस्तक्षेप करून पक्षिप्रेमींनी या कावळ्याची सुटका केली.

कावळा सायकलच्या कॅरिअरमध्ये अडकवला

रामनगर परिसरातून एक व्यक्ती सायकलच्या कॅरिअरमध्ये कावळा अडकवून नेत असल्याचे पक्षिप्रेमी शारदा भांदवकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित व्यक्तीला थांबवून कावळा कुठे घेऊन जात असल्याची विचारणा केली. त्यावर कावळा घरी नेऊन खाणार असल्याचे त्याने सांगितल्याचा दावा पक्षिप्रेमींनी केला. कावळ्याला अशा अवस्थेत पाहून भांदवकर यांनी त्याला सोडण्याची विनंती केली. दरम्यान, संबंधित व्यक्ती कावळ्याचे पंख तोडत असल्याचेही भांदवकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कावळा आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र, संबंधित व्यक्तीने त्यास नकार दिला. त्यानंतर शारदा भांदवकर यांनी सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या स्मिता मिरे यांच्याशी संपर्क साधला. मिरे यांनी प्राजक्ता देव यांना घटनास्थळी पाठवले.

काहीसा वाद, अखेर कावळ्याची सुटका

शारदा भांदवकर आणि प्राजक्ता देव यांनी घटनास्थळी पोहोचून कावळ्याची त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात काहीसा वादही झाला. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची गर्दी वाढू लागल्याचे पाहून संबंधित व्यक्ती सायकल घेऊन तेथून निघून गेल्याचे पक्षिप्रेमींनी सांगितले. सुटका करण्यात आलेल्या कावळ्याला दाभा परिसरातील ‘सेव्ह स्पीचलेस’ संस्थेच्या शेल्टरमध्ये नेण्यात आले. तेथे डॉ. आदित्य सिंग यांनी कावळ्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार केले. सायकलच्या कॅरिअरमध्ये अडकवल्याने तसेच पंखांना इजा झाल्याने कावळ्याला काही दिवस उडता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

पक्ष्यांना इजा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पक्ष्यांना पकडणे, त्यांना इजा करणे किंवा क्रूरपणे वागणूक देणे याविरोधात कायद्यात तरतुदी आहेत. या घटनेत कावळ्याला जखमी केल्याचा आरोप असून, संबंधित व्यक्तीची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षिप्रेमींनी केली आहे. कावळा हा मानवी वस्तीच्या आसपास सहज आढळणारा पक्षी असला तरी पर्यावरणातील त्याचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे केवळ सहज उपलब्ध असलेला पक्षी म्हणून त्याच्याशी क्रूरपणे वागणे योग्य नाही, असे पक्षिप्रेमींचे म्हणणे आहे.