नागपूर : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा जीव गेल्यानंतर राज्यभरात नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रत्येक शहराप्रमाणे नागपुरातही मॅनहोल असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यापासून अवघ्या शंभर मिटर अंतरावर कोतवालीत मुख्य रस्त्यावर मॅनहोल तुटलेल्या स्थितीत आहे.
मॅनहोलवरील झाकणे तुटली, महापालिका निद्रिस्त
शहरात सांडपाणी वाहिनी (सिवेज लाईन) तसेच पावसाळी नालीवर (ड्रेनेज लाईन) १८,६५४ मॅनहोल आहेत. यापैकी ५८८ मॅनहोल क्षतिग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, काही भागांमध्ये मॅनहोलवरील झाकणांना तडे गेले. त्यावर चुकीने पाय पडल्यास एखादा व्यक्ती थेट सांडपाणी वाहिनीत किंवा पावसाळी नालीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात सांडपाणी वाहिनी तसेच पावसाळी नाल्यांचे मोठे जाळे आहे. नाल्यांची स्वच्छता, तपासणी करणे व दुरुस्ती करण्यासाठी मॅनहोल तयार करण्यात आले आहे. महापालिकेने एका खाजगी संस्थेतर्फे शहरातील दहाही झोनच्या मॅनहोलच्या स्थितीबाबत चार महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. यात शहरातील १८,६५४ मॅनहोलची स्थिती पुढे आली.
१३८३ ठिकाणी तातडीने दुरुस्तीची गरज
एकूण १८,६५४ पैकी १६,६८३ मॅनहोल सुस्थितीत आहेत. १९७१ पैकी १३८३ मॅनहोलची तत्काळ दुरुस्तीची गरज असून ५८८ मॅनहोल क्षतिग्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे, यावरील झाकणेही सुस्थितीत नाहीत. याशिवाय १६,६८३ सुस्थितीतील मॅनहोलवरील अनेक झाकणेही व्यवस्थित बसवण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तत्काळ दुरुस्तीची उपाययोजना करण्यात यावी, यासाठी सर्वेक्षणातून मॅनहोलबाबत पुढे आलेली माहिती सर्व दहा झोनला पाठवण्यात आल्याचे महाापलिकेतील सूत्राने नमूद केले. परंतु अद्यापही शहरातील मॅनहोलवरील झाकणे सुस्थितीत नसल्याचे चित्र आहे.
वर्दळीच्या महाल भागात अधिक धोका
शहरातील महाल, कोतवाली रोड, नवाबपुरा झेंडा चौकातील रतनसिंग वाचनालयाजवळ मॅनहोलवरील झाकणे सुस्थितीत नाही. परंतु नागरिकांच्या सुरक्षेसाठी केवळ चार बाजुंनी केवळ दगड ठेऊन मॅनहोलमध्ये एक काठी उभी करण्यात आली आहे. याशिवाय अनेक भागात तुटलेली झाकणे लक्षात यावे, यासाठी एखाद्या कपडा किंवा झाडाची फांदी रोवलेली दिसते. महापालिकेच्या या उपाययोजनेमुळे स्मार्ट सिटीची धिंडवडे निघत आहे.
मॅनहोलची कामेही अर्धवट
महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची अनेक कामे अद्यापही अर्धवट आहे. पावसाळी नालीची अनेक भागात स्वच्छता झाली नाही. यात मॅनहोलची कामेही अपवाद नाही. नाईक रोड महाल येथे सांडपाणी नालीसाठी खोदकाम केले असून त्यावर मॅनहोलची कामेही अर्धवट आहेत. रात्रीच्या काळोखात यात एखादा व्यक्ती पडण्याची शक्यता आहे. आजूबाजूने पडलेल्या लोखंडी सळाखीमुळे पडणाऱ्या व्यक्तीला मोठी दुखापत किंवा जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
पदपाथवर चालणे धोकादायक
शहराच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांच्या बाजूला असलेल्या पदपथाखालीच ड्रेनेज लाईन आहे. किंबहुना ड्रेनेज लाईनवरच पदपथ असून अनेक ठिकाणी मॅनहोल तयार करण्यात आले आहे. मात्र, यावरील झाकणेही गायब झाली आहेत. परिणामी रात्रीच्या अंधारात एखादवेळी पादचारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे पदपथावर अतिक्रमण आहे तर जिथे पदपथ मोकळे आहे, तिथे मॅनहोलवरील चेंबरवर झाकणे नाही, अशी स्थिती आहे.
सत्तापक्ष नेत्याकडून प्रशासनाला सूचना
गुरुवारी पावसाळी तयारीबाबत महापालिकेत बैठक घेण्यात आली. यात शहरातील सांडपाणी वाहिनीवरील मॅनहोलच्या चेंबरवर त्वरित झाकणे लावण्याची सूचना सत्ता पक्षनेता बाल्या बोरकर यांनी प्रशासनाला केली. सांडपाणी वाहिनी तयार करणाऱ्या कंत्राटदाराला दर्जेदार बांधकाम करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावे, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.
मॅनहोलची स्थिती
- एकूण मॅनहोल्स – १८,६५४
- देखभाल, दुरुस्ती केलेले – १६,६८३
- दुरुस्ती न केलेले – १,९७१
- तात्काळ दुरुस्ती आवश्यक – १,३८३
- क्षतिग्रस्त झालेले – ५८८
