नागपूर : पती पत्नीचे नाते नाजूक असते, असे म्हटले जाते. विवाहानंतर कुटुंबात एखादा नवा पाहूणा आला तर घराला पूर्णत्व येऊन संसार आणखी फुलतो, असेही म्हणतात. मात्र विवाहानंतर एक मुलगी झाल्यानंतरही कौटुंबिक वादामुळे मोडून पडलेल्या संसारानंतर तणावात असलेल्या विवाहितेने माहेरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मानकापूर परिसर हादरला आहे.
यातील आणखी चटका लावणारी बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी विवाहितेने मुलीच्या शिक्षणासाठी भिंतीवर लावलेल्या फळ्यावर आपल्या मनातील भावना व्यक्त केली. ‘नो वन ईज रिस्पॉन्सिबल फॉर माय एंड….’ असा चटका लावणारा मजकूर नोंदवून विवाहितेने बुधवारी दुपारी मृत्यूला कवटाळले.
मीनल महेंद्र धोंगळे (३८) असे बुधवारी दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
नेमकी घटना काय घडली ?
मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समता चौकाजवळील पुजा रेसीडेन्सीजवळ मीनल महेंद्र धोंगळे (३८) याचे वडिल राहतात. मीनल यांचे विवाहानंतर काही वर्षांपासून पतीशी पटत नव्हते. त्या गेल्या दोन वर्षांपासून माहेरी वडिलांकडे वास्तव्यास आल्या होत्या. सहा महिन्यापूर्वी त्यांनी पतीशी कायदेशीर फारकत घेतली. तेव्हापासून त्या तणावात होत्या. त्यांना अकरा वर्षाची एक मुलगी आहे. ती त्यांच्याकडे राहते.
नात रुग्णालया अन् मुलगी मृत्यूशय्येवर..
मीनल यांच्या मुलीची प्रकृती खराब असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यासाठी घरून आईवडिल डबा घेऊन रुग्णालयात गेले. त्यामुळे मीनल या घरी एकट्याच होत्या. दुपारी दोन वाजता त्यांचे आईवडील घरी आल्यावर आतून घर बंद असल्याने त्यांनी दाराची बेल वाजवली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारच्या मदतीने दार उघडले. त्यानंतर त्यांनी मुलीला शोधले असता, त्या झोपण्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना खाली उतरवून रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. आजारपणामुळे नात रुग्णालयात असताना घरी आल्यानंतर तिला तुझी आई आता परत येणार नाही, हे कसे सांगावे, या विवंचनेने आई- वडिलांना घेरले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
