नागपूर : शहराला मध्यप्रदेशशी जोडणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मानकापूर उड्डाणपुलाच्या एका भागाला तडे गेले असून सळई बाहेर आली आहे. परंतु दोन महिन्यांहून अधिक काळापासून या पुलाची डागडुजी होऊ शकलेली नाही. या पुलावरील एक मार्गिका बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
मानकापूर ते फरस दरम्यान उड्डाणपुलाच्या एका भागाचे काँक्रिट निघाले असून सळई बाहेर आल्याचे लक्षात येताच एनएचएआयने डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन्ही बाजूला कठडे लावून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. पण, अद्याप कामाला गती मिळालेली नाही. मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या आणि अतिशय वर्दळीच्या या मार्गावरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुचाकी चालवणाऱ्यांना महिलांना तर येथून वाहने काढताना चांगलीत कसरत करावी लागत आहे. आता पावसालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कामात अडथळा निर्माण होत आहे. एनएचआयने उन्हाळ्यात काम पूर्ण केले असते तर ही वेळ आली नसती, असे येथील नागरिक सांगतात.
वर्दळीचा महामार्ग
एनएचआयकडून ३० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद स्पॅन बदलवले जात आहे. काँक्रिटीकरण झाले की त्यानंतर डांबरीकरण केले जाईल. परंतु पावसाळ्यात डांबरीकरण शक्य नाही. त्यामुळे अनेक महिने हे काम चालण्याची शक्यता आहे. – वसंत राऊत, झिंगाबाई टाकळी.
चुकीचे डिझाईन – डवरे
या उड्डाणपुलावर यापूर्वी देखील खड्डा पडला होता. या पुलासाठी चुकीचे डिझाईन आणि निकृष्ट बांधकाम साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे वारंवार या पुलास तडे जातात. या पुलाचे लँडिगही चुकीचे झाले आहे. अगदी चौकात लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. – अरुण डवरे, मानकापूर.