– आभा मेघे

विष्णुदास भावे यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे जनक मानले जाते. त्यांच्या पहिल्या नाटकाचा प्रयोग ज्या दिवशी झाला, तो दिवस म्हणजे ५ नोव्हेंबर. हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. नागपूरच्या मराठी रंगभूमीचा इतिहास अत्यंत समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. मुंबई-पुण्याप्रमाणेच महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरने मराठी नाटकांना आणि लोककलांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्याची सुरुवात साधारणतः रेल्वेच्या आगमनाशी जोडलेली आहे. कारण त्यापूर्वी नाट्य चळवळ पुणे-मुंबईकडे सुरू झाली होती आणि त्या वेळेला नागपूर हा सी.पी. अँड बेरार भाग म्हणून ओळखला जायचा. इथे हिंदी भाषकांचे वर्चस्व जास्त होते. पण रेल्वेमुळे वाहतुकीची सुविधा झाली आणि त्यामुळे पुणे-मुंबईतील लोक नागपुरात शिक्षण व नोकरीसाठी येऊ लागले. त्यांच्यासोबत ही सांस्कृतिक विद्वता देखील नागपुरात आली, असे म्हणता येईल.

नागपूरच्या रंगभूमीचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे सांगता येतील: १) संगीत रंगभूमी २) हौशी, प्रायोगिक आणि महाविद्यालयीन रंगभूमी ३) बालरंगभूमी ४) झाडीपट्टी रंगभूमी. नागपुरात प्रथमतः बर्डीवर मोठ्या मैदानात किंवा मंदिरात नाटकांचे प्रयोग व्हायचे. कालांतराने नागपूरमधील धनवटे रंगमंदिर हे मध्य भारतातील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध नाट्यकेंद्र १९५२ मध्ये तयार झाले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह हे १९८६ मध्ये सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीचे मुख्य केंद्र झाले. त्याचे ब्रीदवाक्य आहे- “संगीतम् नाट्यम् आनंददायकम्”. कविवर्य सुरेश भट सभागृह २०१७ मध्ये तयार झाले याचे ब्रीदवाक्य “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा” हे आहे. नाटकाचा सुवर्णकाळ हा संगीत नाटकाचा मानला जातो. १८८० च्या मध्यास किर्लोस्कर मंडळींनी ‘संगीत शाकुंतल’ नाटकाने रंगभूमीला नवीन रूप दिले. त्याचा प्रभाव नागपूरवरही मोठ्या प्रमाणात पडला. बालगंधर्व, केशवराव भोळे, दीनानाथ मंगेशकर यांचे नाटकांचे प्रयोग नागपुरात हाऊसफुल होत असत. यात नागपुरातील ज्येष्ठ नाटककार नाना जोग व पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर हे मराठी रंगभूमीतील नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, गीतकार, संगीताचे जाणकार आणि प्रयोगशील नेपथ्यकार म्हणून विशेष महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. विशेषतः नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक क्षेत्राला त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोठे आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर “पुरुषोत्तम दारव्हेकर हे नागपूरच्या रंगभूमीला आकार देणारे, कलाकार घडवणारे आणि संगीत, नाट्य, नेपथ्य व प्रसारमाध्यमे यांचा संगम घडवणारे एक संपूर्ण रंगकर्मी होते.” मराठी नाट्यसृष्टीला अनेक दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक नागपूरने दिले आहेत. पुरुषोत्तम करंडक, राज्य नाट्य स्पर्धा, लोकसत्ता करंडक, कामगार कल्याण नाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांतून हौशी कलावंतांना वाव मिळतो. बालरंगभूमी हे एक वेगळे दालन दारव्हेकरांनी बालकांसाठी खुले केले. १९३६ मध्ये बालकलाकार म्हणून रंगभूमीवर उतरणाऱ्या दारव्हेकरांनी पुढे १९४५ ते ४८ मध्ये बाल नाट्य लेखन सुरू केले. ‘संपाचा वार’ आणि ‘स्वर्गाचा बाजार’ ही नाटके त्यावेळेला गणेशोत्सवात प्रसिद्ध झाली. बालरंगभूमीवरील कलाकार मोठे झाल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांनी युवक रंगभूमी उभी केली. त्यामुळे बालकलाकारांच्या पुढील कलाप्रवासालाही त्यांनी दिशा दिली. १८ ऑक्टोबर १९५० रोजी त्यांनी रंजन कला मंदिर या नाट्य संस्थेची स्थापना केली. बालरंगभूमीसाठी दुसरे महत्त्वाचे नाव नागपुरात घ्यायचे असेल तर ते संजय पेंडसेचे. रंजन कला मंदिराची बालरंजनची धुरा त्यांनी सांभाळली. १९७५ पासून ही संस्था बालरंगभूमीसाठी कार्यरत आहे. २०१८ ला मराठी नाट्य परिषदेची घटक शाखा म्हणून बालरंगभूमी परिषदेची स्थापना झाली. या परिषदेच्या उद्देशानुसार बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे बालरंगभूमीशी जुळलेले सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी नागपूरच्या बालरंगभूमी परिषदेची स्थापना केली. ती केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरली. वर्षाला १० ते १२ कार्यक्रम करून त्यातही काही विशेष कार्यक्रम जसे की संस्कृत बालनाट्य स्पर्धा, बहुभाषिक बालनाट्य महोत्सव, नाट्यसंगीत गायन स्पर्धा, बालनाट्य लेखन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, निवेदन कार्यशाळा, नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमांनी बालरंगभूमी परिषदेने बालकांचे व पालकांचे मने जिंकली. लोककलेचा वारसा पुढच्या पिढीला समजावा या उद्देशाने लोककला महोत्सव तसेच दिव्यांग मुलांसाठी विशेष महोत्सवही आयोजित केले.

नाट्य चळवळीचा तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी. १५० वर्षांची परंपरा असलेली ही रंगभूमी महाराष्ट्र राज्यातील पूर्व विदर्भातील एक अत्यंत समृद्ध, जिवंत आणि लोकप्रसिद्ध नाट्यपरंपरा आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा मिळून जो दाट जंगलाचा (झाडीचा) प्रदेश बनला आहे, त्याला ऐतिहासिकदृष्ट्या ‘झाडीमंडळ’ आणि तिथल्या बोलीभाषेला ‘झाडीबोली’ म्हटले जाते. याच प्रदेशात ही रंगभूमी विकसित झाली. काळांतराने नागपुरातील हौशी कलावंतांनी त्याला आधुनिक रूप देत एक समृद्ध रंगभूमी तयार केली. या भागातील सर्वात जुनी आणि महत्त्वाची लोककला म्हणजे ‘दंडार’ होय, जी शेकडो वर्षांपासून या मातीत साजरी केली जात आहे.

पूर्वी या रंगभूमीवर संगीत नाटके आणि पौराणिक कथा जास्त चालत. मात्र, काळासोबत कौटुंबिक, सामाजिक आणि तमाशाप्रधान (लावणीयुक्त) नाटकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. येथील नाटकात संगीत, गाणी आणि लावणी असणे हा अलिखित नियम मानला जातो.

या रंगभूमीची वैशिष्ट्ये म्हणजे रात्रभर चालणारे प्रयोग व स्थानिक बोलीभाषा. यात ग्रामीण भागात दिवाळी ते होळीपर्यंत हे प्रयोग विविध ठिकाणी अगदी छोट्या-छोट्या गावांत होत असतात. तंबूमध्ये होणारे हे प्रयोग भरगच्च असतात. कलाकारांना आर्थिक व गावकऱ्यांना सांस्कृतिक खजिना या रंगभूमीच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. अशा या नागपूरच्या रंगभूमीला समृद्ध इतिहास, वैभवशाली परंपरा आणि अनेक प्रतिभावंत कलावंतांच्या कर्तृत्वाचा वारसा लाभलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत नागपूरच्या रंगभूमीने आपली सांस्कृतिक ओळख जपली आहे. मात्र, इतका प्रदीर्घ आणि गौरवशाली इतिहास लाभूनही पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे-मुंबईच्या रंगभूमीशी स्पर्धा करताना नागपूरची रंगभूमी आजही आपले हक्काचे स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत आहे. नाट्यगृहांची उपलब्धता, आर्थिक पाठबळ, व्यावसायिक संधी, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि नाट्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारी सक्षम व्यवस्था या अनेक आघाड्यांवर अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी रंगकर्मी, रसिक, नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक धोरणकर्ते यांनी एकत्र येण्याची गरज आहे. “नागपूरच्या रंगभूमीचा पडदा कधीच पडलेला नाही; तो प्रत्येक संघर्षानंतर नव्या आशेने पुन्हा उघडत राहिला आहे. गरज आहे ती केवळ टाळ्यांची नाही, तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या हातांची!”

abhameghe@gmail.com