नागपूर : यंदा प्रथमच नागपूरसाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या मारबत व बडग्या महोत्सवासाठी महापालिकेने २ कोटींची तरतूद केली. त्यामुळे मारबत मिरवणुकीत निघणाऱ्या बडग्यांवर लावण्यात येणाऱ्या राजकीय भाष्य व टीकेचे फलक यावर्षी दिसण्याची शक्यता धुसर झाली आहे. यंदा मारबत महोत्सवासाठी तयार करण्यात आलेला फेकू बडग्या ऐनवेळी बदलून पाकिस्तान पंतप्रधानाचा करण्यात आल्याचे एका बडग्या समितीच्या सदस्याने नमुद केले.

बडग्यांच्या आकर्षणाबाबत शंका

पोळ्याच्या पाडव्याला नागपुरात मारबत व बडग्यांच्या मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा आहे. सामाजिक कुप्रथेवर भाष्य करीत, घेऊन जा गे मारबत असा नारा देत बडग्या, मारबत उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. काळाच्या ओघात बडग्यांचे विषय बदलले आहेत. गेल्या काही वर्षांत राजकारण, शासन यावर भाष्य करणारे झाले. गेल्या काही वर्षांपासून अच्छे दिन कधी येणार असा सवाल करणारे बडगे या मिरवणुकीत दिसत होते. महागाई, इंधनदरवाढ, मनपाचा भ्रष्टाचार एवढेच नव्हे बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना लक्ष्य करणारे बडगे दिसत होते. २०१८ मध्ये संग्राम बडग्या उत्सव मंडळातर्फे महिलांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणारे आमदार राम कदम यांचा बडग्या काढण्यात आला होता. २०२२ मध्ये ५० खोक्यांवर भाष्य करणारा काढण्यात आलेल्या बडग्याने अनेकांचे लक्ष वेधले. वाढती जीएसटी, स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा तसेच फुटीर नेत्यांचा बडगाही आकर्षणाचे केंद्र होता. केंद्र व राज्यातील सरकारचे धोरण, राजकीय नेते, भ्रष्टाचार, महागाईवर थेट प्रहार करण्यात येणारे बडगे मिरकवणुकीचे आकर्षण असते. परंतु यंदा मारबत महोत्सवासाठी २ कोटींची तरतूद करीत महापालिकेने स्वत:ला केंद्रस्थानी ठेवल्याने बडग्यांच्या आकर्षणाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

बडग्या समित्यांची फजिती

या महोत्सवाचा प्रसार, नागरिकांना शुल्कासह मारबतचे चिन्ह असलेले टीशर्ट, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेते, अभिनेते यांना निमंत्रण देण्यासाठी पत्रिका आदीवर खर्च केला जात आहे. महापालिकेने या महोत्सवात भाग घेतल्याने सरकार व महापालिकेवर तसेच सत्तेतील नेत्यांवर राजकीय भाष्य, व्यंग आणि टीका करणाऱ्या फालकासह बडगे दिसण्याची शक्यता नसल्याची चर्चा रंगली आहे. महापालिकेमुळे बडग्या तयार करणाऱ्या काही बडग्या समित्यांची फजिती झाली आहे. या बडग्या तयार करणाऱ्या समितीमध्ये भाजपच्या काही नगरसेवकांनी गोडीगुलाबीने स्थान पटकावले. आता ते इतर सदस्यांना सरकारविरोधात तीव्र टिकेचे फलक तयार करू नये, यासाठी दबाव टाकत असल्याचे एका बडग्या समिती सदस्याने सांगितले.

समितीतील नगरसेवकाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

मारबत व बडग्या समितीत भाजपचे नगरसेवक रामभाऊ आंबूलकर यांचा समावेश आहे. त्यांना बडग्याच्या फलकाबाबत माहिती विचारली असता त्यांनी तीन दिवसापासून टाळाटाळ केली. सोमवारी फोन केला असता त्यांनी मंगळवारी चार वाजता येण्यास सांगितले. मंगळवारी त्यांना फोन केला असता पोलीस उपयुक्ताकडे असून वेळ लागेल बुधवारी सकाळी या, असे सांगितले. काल, बुधवारी सकाळी फोन केला असता दोन तासांनी मीच बोलावतो, असे नमुद केले. त्यांना तीन तासानंतर फोन केला असता प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बडग्यांच्या फलकांवर नियंत्रण आल्याची शंका बळावली आहे.

छत्रपती शिवाजी पार्क, मस्कासाथ बडग्या समितीने फेकू बडग्या तयार केला होता. परंतु नंतर तो विषय रद्द करून पाकिस्तानच्या पंतप्रधानाविरोधात बडग्या तयार करण्याचे ठरले.
-मोरेश्वर वानखेडे, छत्रपती शिवाजी पार्क बडग्या समिती, मस्कासाथ.

दरवर्षी सरकारचे धोरण, निर्णय, महागाई यावर बडग्या काढण्यात येते. तेच विषय आम्ही यंदा राहतील. महापालिकेशी याबाबत कुठल्याही चर्चा करण्याची गरज नाही.
-नितीन यादव, छत्तीसगढी समाज बडग्या उत्सव समिती, डिप्टी सिग्नल.