नागपूर : शहरातील इतवारी, महाल भागातून ऐतिहासिक मारबत व बडग्यांची मिरवणूक सुरू झाली असून पावसातही नागरिकांचा उत्साह कायम आहे. यंदाही विविध मुद्द्यावर प्रहार करणारे बडगे दिसून येत आहे. या मारबत महोत्सवाला १४५ वर्षांचा इतिहास आहे.

असा आहे इतिहास

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत उत्सव हा संपूर्ण जगात फक्त नागपूर शहरातच साजरा केला जातो. या उत्सवाला १४५ वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. मारबत उत्सवाची सुरुवात ब्रिटिश राजवटीत सन १८८१ मध्ये झाली. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्याचप्रमाणे नागपुरात ब्रिटिशांच्या जाचक नियमांना (जसे की ५-१० लोका एकत्र येण्यावर बंदी) बगल देण्यासाठी आणि लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी या उत्सवाची सुरुवात झाली.

पौराणिक संदर्भही दिले जातात

काही आख्यायिकांनुसार, मारबत हे महाभारतातील पुतना मावशीचे रूप मानले जाते, जिने बालकृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला होता. काळी आणि पिवळी मारबतया महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘काळी मारबत’ आणि ‘पिवळी मारबत’ आहे. भोसले राजघराण्यातील राणी बकाबाई हिने १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना मदत केली होती. तिच्या या देशद्रोहाबद्दल जनतेने व्यक्त केलेला संताप आणि निषेध म्हणून ‘काळी मारबत’ तयार करण्याची परंपरा सुरू झाली. ही मारबत नेहरू पुतळा परिसरातील श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे तयार केली जाते. तऱ्हाने तेली समाजाच्या वतीने १८८५ मध्ये पिवळ्या मारबतीची सुरुवात करण्यात आली. ही मारबत ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचे तसेच समाजातील रोगराई, साथीचे आजार आणि दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक मानली जाते.

बडग्यांची परंपरा

मारबतीसोबतच मिरवणुकीत ‘बडग्या’ नावाचे पुरुषाचे पुतळेही काढले जातात. हे बडगे दरवर्षी समाजातील चालू घडामोडी, भ्रष्टाचार, महागाई, वाईट चालीरीती किंवा राजकीय मुद्द्यांवर जळजळीत भाष्य करण्यासाठी आणि लोकांचा संताप व्यक्त करण्यासाठी तयार केले जातात. आजही भालदारपुरा येथील एकता मारबत उत्सव मंडळाद्वारे अध्यक्ष विजय मतेलकर यांच्या नेतृत्वात विशेष पांढरी मारबत काढली जाणार आहे. मार्च २०२५मध्ये मेरठ येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने मर्चंट नेव्हीतील पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे सिमेंटच्या ड्रममध्ये लपविल्याची घटना घडली होती. या गुन्हेगारी प्रवृत्तीचा निषेध या मारबतीद्वारे नोंदविण्यात आला. याशिवाय पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर, महागाई, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आदी विषयांचा समावेश आहे. भालदारपुऱ्यातील अविघ्न बडग्या उत्सव मंडळाने अध्यक्ष सोमू बिराह यांच्या मार्गदर्शनात महापालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडणारा बडग्या साकारला आहे. मस्कासाथ येथील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर यांच्यावर टीका करणारा बडग्या तयार केला आहे. त्यावर ‘फेल्ड मार्शल’, ‘फेल कमाल, बलूचिस्तान में बुरा हाल’ अशा उपरोधिक घोषणा आहे. चकना चौकातील भारतीय जनता पार्टी बडग्या उत्सव समितीतर्फे अध्यक्ष सचिन थापे यांच्या नेतृत्वात राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा बडग्या दिसून आला. यात ‘कॉक्रोच जनता पार्टीला घेऊन जा गे बडग्या’ अशा घोषणांचा मारा दिसत आहे.

चार हजार पोलिसांचा ताफा

मारबत उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली आहे. मिरवणुकीसाठी पोलिस हाय अलर्टवर असून, सेक्टरनुसार सुमारे चार हजार पोलिसांचा ताफा तैनात आहे. दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना थेट पोलिस कोठडीत डांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी तीन अपर पोलिस आयुक्त, सात उपायुक्त, १४ सहायक आयुक्त, ५५ निरीक्षक, ३५० सहायक निरीक्षक, एसआरपीएफची तुकडी व सुमारे हजार होमगार्ड तैनात आहेत. मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.