नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो रुग्णालय) क्षयरोग विभागातर्फे ‘निदान-क्षयरोग’ हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारितील हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित क्ष-किरण तपासणी, फिरत्या वाहनातून छातीची तपासणी आणि अद्ययावत प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या मदतीने क्षयरोगाचे समन्वित व जलद निदान केले जात आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २५ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण झाली, दुसऱ्या टप्प्यात आणखी ७५ हजार जणांची तपासणी होणार आहे. नागपूर जिल्हा खनिज निधीच्या सहाय्याने सुरू केलेल्या प्रकल्पात शहरातील विविध भागांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला, मूत्रपिंड विकार तसेच इतर सहआजार असलेल्या नागरिकांची तपासणी केली जाते. यासाठी विशेष माॅलिक्युलर प्रयोगशाळा असलेल्या फिरत्या वाहनातून वैद्यकीय पथके वस्त्यांमध्ये जाऊन माहिती संकलित करतात आणि प्राथमिक तपासणी करतात. संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची तत्काळ वाहनात उपलब्ध कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित क्ष-किरण तपासणी केली जाते. त्याचबरोबर थुंकीचे नमुने गोळा करून मेयो रुग्णालयातील अद्ययावत प्रयोगशाळेत पाठवले जातात.

नागपुरात अशी झाली तपासणी

सदर प्रकल्पांत पहिल्या टप्प्यात नागपूर शहरातील २५ हजार २८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार ६८९ जण संशयित आढळले. ३ हजार ३७२ जणांमध्ये क्षयरोगाची सौम्य लक्षणे होती. ६० जणांना यापूर्वी क्षयरोग होऊन गेला होता. २ हजार ४७९ जणांना सहआजार होते. २ हजार २१० जणांना धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय होती. मेयोच्या प्रयोगशाळेत अंतिम आरटीपीसीआर तपासणीनंतर ५३ जणांमध्ये क्षयरोगाची खात्री झाली. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांनी यापूर्वी क्षयरोग तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्लाही घेतला नव्हता. त्यामुळे लक्षणे असूनही अनेक जण तपासणी टाळतात आणि त्यामुळे आजार वाढण्याची शक्यता असल्याचे या प्रकल्पातून स्पष्ट झाले आहे.

७,६२४ जणांचा एआय आधारित एक्स-रे

प्रकल्पाअंतर्गत नागपुरातील ७ हजार ६२४ जणांचा एआय आधारित एक्स-रे घेण्यात आला. त्यात १ हजार २३८ जणांना क्षयरोग असण्याचा धोका वर्तवला गेला होता. आरटीपीसीआर तपासणीत त्यापैकी ५३ जणांमध्ये क्षयरोगाचे निदान झाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून मेयो रुग्णालयात सुरू झालेल्या या क्षयरोग निदान प्रकल्पात नागपूर शहरात घराघरांत जाऊन तपासणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ७५ हजार नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५३ रुग्णांनी क्षयरोगाची लक्षणे असूनही डॉक्टरांकडे जाणे टाळले होते. या आजाराच्या उच्चाटनासाठी लक्षणे दिसताच तातडीने निदान व उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

– डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय, नागपूर