नागपूर : उपराजधानीतील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे निवासी डॉक्टरांसाठी ७० कोटी रुपयांचे १० मजली नवीन वसतिगृह उभारण्याचे काम सुरू झाले असून त्यात विवाहित डॉक्टरांसाठी २६ स्वतंत्र गाळ्यांची सोय करण्यात येणार आहे. विवाहित निवासी डॉक्टरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांची अवस्था जीर्ण असून राहण्याच्या सोयींचा अभाव आहे. यामुळे निवासी डॉक्टरांकडून वेळोवेळी आंदोलनही झाले आहे. पदव्युत्तर जागा वाढल्याने डॉक्टरांची संख्या वाढली असली तरी वसतिगृहांची संख्या त्यानुसार वाढली नाही. त्यामुळे अनेक डॉक्टरांना बाहेर भाड्याच्या गाळ्यात राहावे लागते.

मेयो रुग्णालयात गेल्या २० वर्षांपासून निवासी डॉक्टरांच्या निवासाचा प्रश्न होता. नव्या वसतिगृहामुळे हा प्रश्न सुटणार आहे. या वसतिगृहात एकूण २४६ डॉक्टरांसाठी खोल्या असतील. त्यापैकी विवाहितांसाठी २६ गाळे असून त्यात स्वयंपाकघर व शयनकक्षाची सोय असेल. अविवाहितांसाठी स्वतंत्र एकेरी खोल्या असतील.

सध्या मेयोमध्ये एमबीबीएसच्या २०० आणि पदव्युत्तरच्या १५२ जागा आहेत. भविष्यात एमबीबीएस २५० व पीजी २०८ करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे निवासाची गरज वाढली आहे. सध्या ७ मजली जुन्या वसतिगृहात ४४१ खोल्या असून नव्या इमारतीत २१६ नवीन खोल्या मिळणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण खात्याच्या पुढाकाराने मेयोतील वसतिगृह पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सुमारे १५ हजार चौरस मीटर जागेत इमारत उभारली जाईल. प्रत्येक मजला १५०० चौरस मीटरचा असेल. भूतळावर जेवणाचा हॉल, किचन, व्यायामशाळा, वाचनालय व प्रतीक्षागृह असेल. पहिल्या मजल्यावर ९ खोल्या आणि उर्वरित ९ मजल्यांवर प्रत्येकी २३ खोल्या असतील. प्रत्येक खोलीत स्नानगृह, गॅलरी आणि ये-जा सुलभ होण्यासाठी ६ लिफ्टची सोय असेल. वसतिगृहात विवाहितांसाठी २९ स्वतंत्र गाठे असेल. – डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय, नागपूर</strong>.

पदवी, पदव्युत्तर, विशेषोपचार अभ्यासक्रमासह आंतवासिता व शासकीय रुग्णालयात सेवा देण्याचे बाॅन्ड असे शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे वय ३४-३५ वर्षांपर्यंत पोहोचते आणि या काळात अनेक निवासी डाॅक्टरांचे विवाह होतात. मात्र शासकीय महाविद्यालयांत विवाहित निवासी डॉक्टरांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अनेकांना त्रास होते. मेयोत विवाहित निवासी डाॅक्टरांना स्वतंत्र गाळे करण्याचा हा प्रयोग राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांत राबवण्याची गरज आहे. – डॉ. सुयश धवने, महासचिव, मार्ड संघटना.