नागपूर : रुग्णालयात गंभीर रुग्णाला आधी उपचार मिळणे अपेक्षित असताना त्याच निर्णयावरून डॉक्टरालाच मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार मेयो रुग्णालयात घडला. एका गंभीर रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन त्याला प्राधान्याने तपासणाऱ्या निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांनी लक्ष्य केले. डॉक्टरची कॉलर पकडून त्यांना खाटेवर ढकलण्यात आले, तर ठोसाही मारण्यात आला. विशेष म्हणजे, हल्ला करणारे नातेवाईक पोलिस असल्याची माहिती पुढे आली आहे. रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था असतानाही डॉक्टरांवर हात उचलला जात असल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मेयोमध्ये नेमके काय घडले?

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) शस्त्रक्रिया विभागात बुधवारी (ता. ४) दुपारी हा प्रकार घडला. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची तपासणी सुरू असतानाच दुसरा गंभीर रुग्ण दाखल झाला. दोन्ही रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन निवासी डॉक्टर डॉ. समीर चांदेकर यांनी अधिक गंभीर असलेल्या रुग्णाची तपासणी आधी सुरू केली. मात्र, याच निर्णयावरून दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांनी आक्षेप घेतला.

डॉक्टरांवर हल्ला का करण्यात आला?

आमच्या रुग्णाला आधी तपासा, त्यानंतर दुसऱ्या रुग्णाकडे लक्ष द्या, असा आग्रह नातेवाइकांनी धरला. डॉक्टरांनी गंभीर रुग्णाला प्राधान्य दिल्याने वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेल्या या प्रकाराने काही क्षणांतच हिंसक वळण घेतले. संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांना शिवीगाळ केली. त्यांची कॉलर पकडून त्यांना खाटेवर ढकलले आणि ठोसा मारला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या इतर रुग्णांसमोरच हा प्रकार घडला.

हल्लेखोर कोण होते?

या घटनेत मारहाण करणारे रुग्णाचे नातेवाईक पोलिस असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपशील समोर आलेला नाही. रुग्णालयातील डॉक्टरांशी वाद घालून त्यांच्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

प्रशासनाने काय कारवाई केली?

घटनेची माहिती मिळताच मेयोचे अधिष्ठाता डॉ. अविनाश गावंडे यांनी तातडीने दखल घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे यांनी तहसील पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. मारहाणीच्या वेळी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनेही संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असलेली व्यवस्था कुचकामी ठरतेय का?

शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही रुग्णालयातच डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने या व्यवस्थेच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णाची प्रकृती पाहून उपचारांचे प्राधान्य ठरविणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे. अशा वैद्यकीय निर्णयावरून डॉक्टरांना मारहाण होत असेल, तर त्यांनी सुरक्षितपणे काम कसे करायचे, असा प्रश्न निवासी डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे.

या घटनेचे परिणाम काय होऊ शकतात?

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य वेळी उपचार मिळणे महत्त्वाचे असते. मात्र, उपचारांच्या प्राधान्यावरून डॉक्टरांनाच मारहाणीचा सामना करावा लागत असेल, तर त्याचा परिणाम रुग्णसेवेवरही होऊ शकतो. मेयोतील या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अधिक ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता पोलिस या तक्रारीवर काय कारवाई करतात, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.