नागपूर : महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक उद्या, शुक्रवारी होणार आहे. भाजपला स्पष्ट बहुमत असून त्यांना कुणाचीही गरज नाही. परंतु सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून पुढील पाच वर्षे विकास कामे करून घेण्यासाठी एमआयएम व मुस्लिम लिग भाजपला मतदान करणार की मतदानाच्या प्रक्रियेपासून अलिप्त राहणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट कॉंग्रेससोबतच्या आघाडीत आहे. त्यामुळेही एमआयएम, मुस्लिम लिगचे एकूण दहा नगरसेवक कोणती भूमिका घेतील, याबाबत उत्सुकता आहे.

नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार असून, १६ स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या विशेष सभेची सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली आहे. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहणार आहेत.

महापौरपदासाठी भाजपने नगरसेविका नीता ठाकरे यांनी तर काँग्रेसकडून नगरसेविका स्नेहल ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार नगरसेविका लीला हाथीबेड व काँग्रेसकडून यापदासाठी नगरसेवक विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केला. भाजपचे १०२ सदस्य आहेत तर कॉंग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या आघाडीचे ३६ नगरसेवक आहेत. याशिवाय एमआयएम ६, मुस्लिम लिग ४ तसेच बसपा व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत सत्तेत आहे. महापालिकेत एकमेव सदस्य असलेल्या आभा पांडे भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. बसपाने नेहमीच सत्ताधारी व विरोधी पक्ष कॉंग्रेसपासून अंतर कायम राखले आहे. त्यामुळे बसपा अलिप्त राहण्याची शक्यता आहे. एमआयएम व मुस्लिम लिगचे मिळून दहा सदस्य होतात. एमआयएम भाजपसोबत जाणार नाही, मात्र निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

मुस्लिम लिगचे असलम खान यांची नेहमीच भाजपसोबत मैत्री राहीली. त्यांनी या मैत्रीचा वापर प्रभागातील विकास कामांसाठी करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या भूमिकेकडे अनेकांच्या नजरा आहेत.

अर्जाची छाननी, अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक

विशेष सभेला सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उमेदवारी अर्जांची छाननी करतील. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक होणार आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सभेला येताना निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेले सूचनापत्र व निवडून आल्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन मनपा सचिव डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.