नागपूर : भारतीय जनता पक्ष शिस्तीसाठी ओळखला जातो. पक्षाने दिलेला आदेश कार्यकर्ता असो की नेता, त्याला पालन करणे बंधनकारक असते. परंतु शिस्तप्रिय भाजपमध्ये उमेदवाराने उपमहापौरपदाची उमेदवारी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपच्या संसदीय समितीने उपमहापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक ॲड. संजय बालपांडे यांचे नाव निश्चित केले होते. परंतु या पदावरून बालपांडे नाराज असल्याचे संकेत मिळत आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन उपमहापौरपद स्वीकारण्यास अनुत्सुकता दर्शवल्याची धक्कादायक माहिती अर्ज दाखल करण्याच्या काही तासापूर्वी पुढे आली आहे.

बालपांडे यांनी नकार दिल्याने भाजपला आता वेगळा पर्याय शोधावा लागला आहे. आता या पदासाठी लीला हातीबेड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ॲड. बालपांडे हे स्थायी समिती सभापतीपदासाठी इच्छुक होते. मात्र, यासाठी संसदीय समितीने इतर नाव निश्चित केल्याने बालपांडे यांच्या अपेक्षाभंग झाला. दरम्यान आज महापौर, उपमहापौरपदासाठी आज सोमवारी दुपारी नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असून त्यांच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. मात्र, कॉंग्रेसनेही नामांकन अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेत भाजपला आव्हान दिले आहे.

त्यामुळे ६ फेब्रुवारीला महापौर व उपमहापौरपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी आज सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात दुपारी ३.०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. भाजपकडून प्रभाग २८ मधील ज्येष्ठ नगरसेविका निता ठाकरे यांचे नाव अंतिम झाले आहे. निता ठाकरे यांच्यामुळे आता दिव्या धुरडे व विशाखा मोहोड यांची नावे महापौरपदाच्या शर्यतीतून बाद झाली आहे.

कॉंग्रेसतर्फे स्नेहल ठाकरे, विवेक निकोसे उमेदवार

कॉंग्रेसने महापौरपदासाठी प्रभाग ११ मधील स्नेहल ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय उपमहापौरपदासाठी प्रभाग ९ मधील विवेक निकोस यांना उमेदवारी देण्यात आल्याचे गटनेते संजय महाकाळकर यांनी सांगितले. त्यामुळे महापौरपदासाठी नीता ठाकरे विरुद्ध स्नेहल ठाकरे व उपमहापौरपदासाठी लीला हातीबेडविवेक निकोसे यांच्यात लढत होणार आहे. मागील महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने रमेश पुणेकर यांना उभे केले होते. त्यांचा पराभव करून दयाशकंर तिवारी महापौर झाले होते.

भाजप केली गट नोंदणी

विभागीय कार्यालयात गट नोंदणीसाठी भाजप नगरसेवक आज सकाळी पोहोचले. गटनेते बाल्या बोरकर हे सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह विभागीय कार्यालयात उपस्थित होते. विभागीय कार्यालयात नोंदणीनंतर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

भाजपने घेतले सर्व नगरसेवकांचे राजीनामे

महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या निवडून आलेल्या सर्व १०२ नगरसेवकांचे भाजपने राजीनामे घेतले आहे. मागील सत्ताकाळातही राजीनामे घेण्यात आले होते. पक्ष विरोधी कारवाई किंवा इतर अनुचित प्रकारात कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आल्याची माहिती आहे. गटनेते बोरकर यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांनी राजीनामे लिहून दिले आहेत. हा पक्षाअंतर्गत आचारसंहितेचा एक भाग असल्याचे ज्येष्ठ नगरसेवकाने नमुद केले.