नागपूर : विभागीय आयुक्तांकडून महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. परंतु भाजपचा महापौरपदाचा पेच अद्यापही कायम आहे. महापौरपद खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यासाठी अनेकांची नावे शर्यतीत आहे. मात्र आरक्षण मर्यादा ओलांडल्याने ओबीसी नगरसेवकांवर संकट कायम आहे. पुढील काळात त्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम महापौरपदासाठी ओबीसी नगरसेविकेला संधी द्यायची की खुल्या प्रवर्गालाच प्राधान्य द्यायचे, यात भाजप अडकली असल्याचे सूत्राने नमूद केले.

सव्वा वर्ष ओबीसी व सव्वा वर्ष खुला प्रवर्ग या सूत्रावरही विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपने मागील सत्ताकाळात हेच सुत्र वापरत आमदार संदीप जोशी व शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांना महापौरपद दिले होते. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीसाठी २ फेब्रुवारीला नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे याच दिवशी महापौरपदाच्या नावावरून पडदा उठणार आहे.

महापालिका निवडणूक होऊन आता पंधरा दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, स्पष्ट बहुमत असूनही भाजपला ना महापौरपदाचा उमेदवार निश्चित करता आला, ना गट नोंदणीही करता आली. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. भाजपच्या संसदीय समितीची बैठक बुधवारी हो्णार होती. यात महापौरपदासह उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षावर चर्चा करण्याचे नियोजित होते. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. गुरुवारी ही बैठक झाली नसल्याचे भाजपमधील ज्येष्ठ नगरसेवकाने नमूद केले.

शुक्रवारी ही बैठक होण्याबाबतही काहीही संकेत नसल्याची पुस्तीही नगरसेवकांनी जोडली. दरम्यान, संसदीय समितीतील नेत्यांनी नगरसेवकांच्या घरोघरी भेट देऊन गट नोंदणीसाठी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा कार्यक्रम पार पडला. याचदरम्यान नगरसेवक तसेच ज्येष्ठ नेत्यांनी महापौरपदाचा उमेदवाराबाबतही चर्चा केल्याचे सूत्राने नमूद केले. महापौरपद खुल्या प्रवर्गातील नगरसेविकेसाठी राखीव आहे. परंतु आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने ओबीसी नगरसेवकांचे सदस्यत्व धोक्यात येण्याची शक्यता बघता याच प्रवर्गाला महापौरपद द्यायचे की खुल्या प्रवर्गाला, अशा विचारात नेते अडकले असल्याचे सूत्राने नमूद केले. त्यामुळे यावर तोडगा म्हणून सव्वा सव्वा वर्षाचे ओबीसी व खुल्या प्रवर्गाला महापौरपदाचे सूत्र वापरले जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी मागील सत्ताकाळात सव्वा-सव्वा वर्षांच्या महापौरदाचे सूत्र भाजपने वापरले आहे. मागील सत्ताकाळातील उर्वरित अडीच वर्षातील सव्वा वर्ष संदीप जोशी यांना तर त्यानंतरचे सव्वा वर्ष दयाशंकर तिवारी यांना महापौर करण्यात आले होते. भाजपचे हे सूत्र यशस्वीही ठरले होते. त्यामुळे याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे.

महापौर, उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

महापालिकेच्या सचिवालयाने येत्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापौरपदासाठी निवडणूक ६ फेब्रवारीला घेण्यात येणार असल्याने तीन दिवसापूर्वी, अर्थात २ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारीला सभा सुरू होताच उमेदवारी अर्जाची छाननी, त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा व मतदान घेतले जाणार आहे. शेवटी निकालाची घोषणा करण्यात येईल. हीच पद्धत उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी वापरली जाईल. त्यानंतर महापौर व सत्तापक्ष नेते व विरोधी पक्षनेत्यांनी स्थायी समिती सदस्यत्वासाठी दिलेल्या नगरसेवकांची नावाला सभागृहाची मान्यता देण्यात येणार आहे.