scorecardresearch

विकास कामात पारदर्शकता  आणून शहराचे नाव मोठे करा

पारदर्शकतेच्या मुद्यावर जनतेने कौल दिला आहे. पाच वर्षे भरपूर मेहनत केली तर त्याचे फळ मिळेल.

विकास कामात पारदर्शकता  आणून शहराचे नाव मोठे करा
महापालिका सभागृहात पदग्रहण समारंभात बोलताना  महापौर नंदा जिचकार.  (लोकसत्ता छायाचित्र)

महापौर नंदा जिचकारांचे आवाहन; महापौर, उपमहापौर, सत्ता पक्षनेत्यांनी पदभार स्वीकारला

स्थानिक स्वराज्य संस्थांत पूर्वी महिलांना फारसे स्थान नव्हते. मात्र, ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर या संस्थांमध्ये महिलांचा वाटा वाढला. त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. विकास कामात पारदर्शकता आणून शहराचे नाव मोठे करा आणि विकास कामातून स्वतची वेगळी ओळख निर्माण करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांचा पदग्रहण समारंभ सोमवारी महापालिकेच्या सिव्हील लाईन कार्यालयात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, माजी महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर,  नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, माजी सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर सतीश होले, माजी महापौर वसुंधरा मसुरकर, पुष्पा घोडे, अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते.

जुन्या काळात महिलांना घराबाहेर पडू दिले जात नव्हते. मात्र, आज तशी परिस्थिती नाही. विविध क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे मिळालेली संधी सोडू नका, पक्षाने (भाजप) संधी उपलब्ध करून दिली. पारदर्शकतेच्या मुद्यावर जनतेने कौल दिला आहे. पाच वर्षे भरपूर मेहनत केली तर त्याचे फळ मिळेल. अधिकारी आणि सर्व पक्षातील गटनेते, पक्षाचे पदाधिकारी यांना बरोबर नागपूर शहराचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करू, असे जिचकार म्हणाल्या.

शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे म्हणाले, शहराच्या विकासाची दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुली करून दिली आहे. स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी पारदर्शकपणे काम करून शहराचा विकास करावा. राज्यात पारदर्शकतेने काम करणारी नागपूर महापालिका ही पहिली महापालिका असल्याचा दावा करीत कोहळे यांनी अन्य महापालिकेत तेवढी पारदर्शकता नसल्याचे सांगत टीका केली. येणारा काळ विकासाच्या दृष्टीने संघर्षांचा काळ आहे. त्यामुळे कामात पारदर्शकता ठेवत भ्रष्टाचार मुक्त महापालिका करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.  यावेळी प्रवीण दटके यांनी नव्या महापौरांचे अभिनंदन करून त्यांच्याबरोबर काम करणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे गट नेते संजय महाकाळकर यांनी पदग्रहण कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक होते आणि त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कार्यक्रमाचे संचालन दिव्या धुरडे यांनी केले. संदीप जोशी यांनी आभार मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2017 at 01:13 IST

संबंधित बातम्या