नागपूर: नागपूरच्या निता ठाकरे यांचा पदग्रहण सोहळा सोमवारी महापालिकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महापौर निता ठाकरे यांनी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा व प्रशासनाच्या कारभाराला गती अशी शहर विकासाची ‘ब्लू प्रिंट’ सादर केली. त्यांनी महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर आगामी काळात सर्व ३८ प्रभागांमध्ये महापालिकेची एक इंग्रजी शाळा असावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
निता ठाकरे म्हणाल्या, हल्ली इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये पाल्याने शिकावे असे प्रत्येक पालकाला वाटते. मात्र, खासगी शाळांमध्ये शिकवणे आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील पालकांना शक्य होत नाही. बरेचदा खासगी शाळांमध्ये मुलाला घातल्यानंतर त्यावर मोठा खर्च होतो. महापालिकेच्या सध्या तेरा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये शिकवणे आर्थिकदृष्ट्याही शक्य होते. त्यामुळे आगामी काळात सर्व ३८ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक इंग्रजी माध्यमांची महापालिका शाळा असावी यासाठी पुढाकार घेणार आहे. यात बंद झालेल्या महापालिका शाळा पुन्हा सुरू करून त्याठिकाणी इंग्रजी माध्यम सुरू केल्या जाईल. इंग्रजी बरोबरच मराठी माध्यमांच्या शाळांनाही चांगले दिवस कसे येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. एकूणच महापालिका शाळांच्या बळकटीकरणासाठी एक सर्वसमावेश आराखडा तयार करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली.
शाळांमध्ये मुलींना सॅनिटरी पॅड वितरण
महापालिका शाळांचे बळकटीकरण करण्याबरोबर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपाययोजना राबवणे किती महत्वाचे आहे याबद्दलची माहिती त्यांनी दिली. यात मुलींना शाळांमध्ये सॅनिटरी पॅडसचे वितरण हा अत्यंत हा आरोग्य आणि त्यांच्या एकूणच व्यक्तीमत्वाच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. शिक्षण हे केवळ वर्गखोल्या, पुस्तके यांच्यापुरते मर्यादित राहायला नको, तर विद्यार्थ्यांना खऱ्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड देता येईल याचीही शिकवण मिळावी असेही त्या म्हणाल्या. शिक्षणाबरोबरच महापौरांनी शहरातील मूलभूत सोयी सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यात शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती कशी सुधारता येईल यावर भर देण्यात येणार आहे.
अलिकडच्या काही वर्षात मोठी सुधारणा झाली असली तरी अजूनही सुधारणेला वाव आहे. यावेळी टँकरच्या वितरणात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. पाणी पुरवठ्याची समस्या ज्याठिकाणी आहे, त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असून नेमकी स्थिती काय आहे हे समजावून घेतले असल्याचे ठाकरे म्हणाल्या. यावेळी त्यांनी शहरातील आरोग्याशी संबंधीत उपाययोजना अधिक चांगल्या कशा करता येईल, याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यात महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या आरोग्याशी संबंधित सोयी सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर, दंडात्मक कारवाईचा इशारा
शहरातील पर्यावरणाचे संरक्षण व त्याचा शाश्वत विकास करण्यावर भर राहणार आहे. यासाठी शहरातील भूजलचा स्तर वाढावा यासाठी असलेली ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या उपाययोजना करणे नव्या इमारत बांधकामा दरम्यान बंधनकारक आहे. याचे पालन होत आहे किवा नाही यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
