नागपूर : मतमोजणीनंतर १५ दिवसांनी नागपूर नगरीच्या ५५ व्या महापौराचा तिढा शुक्रवारी रात्री सुटला असून दक्षिण नागपुरातील नगरसेविका महापौरपदी विराजमान होणार असल्याचे सुत्राने सांगितले.  दिव्या धुरडे, निता ठाकरे या दोघी नगरसेविका दक्षिण नागपुरातील आहे, परंतु नाव जाहीर करण्यात आले नसल्याने उत्सुकता वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत आठव्या महिला महापौरपदासाठी विशाखा मोहोड, शिवानी दाणी, दिव्या धुरडे, निता ठाकरे, अश्विनी जिचकार, संतोष लढ्ढा यांच्या नावावर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमासोबत बोलताना जी नावे चर्चेत आली, त्यावर दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल, असे सांगितले. त्यामुळे महापौरबाबत मतभेद तर नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.

महापौरपदावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले. विमानतळावरून ते थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके हेही पोहोचले. त्यांनी गेल्या काही दिवसांत नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेचा तपशील बैठकीत सादर केला. त्यानुसार महापौरपद दक्षिण नागपूरला मिळणार असल्याचे सुत्राने नमुद केले. त्यामुळे दिव्या धुरडे की निता ठाकरे, असा प्रश्न कायम आहे. येत्या २ फेब्रुवारीला महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे २ फेब्रुवारीलाच महापौरपदाच्या नावारून पडदा उठणार आहे. १६ जानेवारीला मतमोजणी झाली. २२ जानेवारीला महापौरपदासाठी आरक्षण काढण्यात आले. नागपूरचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर आठ दिवसांत भाजपला महापौरपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले नाही. एवढेच नव्हे भाजपने अद्यापही गटाची नोेंदणी केली नाही.

नगरसेवक बैठकीपासून लांबच

सायंकाळी फडणवीस गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचणार असल्याचे समजताच महत्त्वाचे भाजप नेते, आमदार पोहोचले. बैठकीपासून ज्येष्ठ नगरसेवकांनाही लांब ठेवण्यात आले होते. त्यामुळे बैठकीत नेमके काय होते, याबाबत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली. याशिवाय काहींनी महापौरपदी कोण विराजमान होणार, हे जाणून घेण्यासाठी गडकरी यांच्या निवासस्थानाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

तर पहिल्या महापौरांच्या पुण्यतिथीदिनी ठरले असते ५५ वे महापौर

नागपूर नगरीचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची शुक्रवारी पुण्यतिथी होती. महापालिकेत त्यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करून अभिवादन करण्यात आले. नेमक याच दिवशी शहराचा ५५ वा महापौर निश्चित होऊन नावाची घोषणा व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. त्यांच्या कन्या कुंदा विजयकर यांना नागपूर नगरीच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर कल्पना पांडे, वसुंधरा मासुरकर, पुष्पा घोडे, माया इवनाते, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार या महिला महापौरांनी आपल्या कार्याची छाप पाडली.

शहर अध्यक्ष व आमदार अंतिम निर्णय घेतील : फडणवीस

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी मार्गदर्शक व आमचे नेते आहेत. त्यामुळे महापौरपदावर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. चर्चेनुसार एक रुपरेषा ठरवण्यात आली. बैठकीत जी नावे चर्चेत आली, त्यावर उद्या, शनिवारी किंवा रविवारी निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमासोबत बोलताना सांगितले. नावांबाबत रुपरेषा ठरविण्यात आली आहे. शहर अध्यक्ष व आमदार अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी नमुद केले.