नागपूर : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकेकाळी एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजी (एम.डी. विकिरणोपचार कर्करोगशास्त्र) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांवर पहिल्याच फेरीत प्रवेश पूर्ण होत असे. मात्र यंदा तीन फेऱ्या होऊनही या विषयाच्या जागा रिक्तच आहेत. लिनिअर एक्सिलेटरसह अद्ययावत यंत्रसामग्रीचा अभाव आणि इतर गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशाकडे कल कमी झाल्याचा आरोप वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत आपण जाऊन घेऊ या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल ) ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे यांच्या प्रयत्नांतून सुमारे २०११ मध्ये एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर काही वर्षे पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच फेरीत सर्व जागांवर प्रवेश होत असे. अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळत होता. मात्र कालांतराने कर्करोग विभागात जुन्या कोबाल्ट यंत्रावरच उपचार सुरू राहणे, ब्रेकीथेरपी यंत्र कालबाह्य होणे, नवीन कर्करोग रुग्णालयाचा प्रस्ताव रखडणे तसेच लिनिअर एक्सिलेटर यंत्र उपलब्ध न होणे आदी कारणांमुळे विभागाची प्रतिमेला धक्का बसला. परिणामी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांचा ऋची कमी झाल्याचे चित्र आहे.
डिसेंबर २०२५ पासून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तीन फेऱ्यांनंतरही पाचपैकी केवळ तीन जागांवर प्रवेश झाले. उर्वरित दोन जागा पुढील फेरीत भरल्या जातील, अशी अपेक्षा मेडिकलचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत. देशात सर्वाधिक मागणी असलेल्या अभ्यासक्रमापैकी एक मानल्या जाणाऱ्या एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजीसारख्या अभ्यासक्रमासाठी नागपूर मेडिकलमधील कर्करोग विभागातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या गैरसोयींचा फटका कर्करुग्णांनाही बसत असल्याचे सांगितले जाते. पेशंट राईट्स असोसिएशनकडून शासनाकडे वारंवार मेडिकलमधील कर्करुग्णांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या गैरसोयी दूर झालेल्या नाहीत, हे विशेष.
एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजी अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ काय ?
एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजी हा कर्करोग उपचारातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम आहे. त्याचा कालावधी ३ वर्षांचा आहे. एमबीबीएस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासकरामत कर्करोगांचे निदान व स्टेजिंग, रेडिओथेरपी तंत्रज्ञान, केमो-रेडिएशन उपचार, ट्यूमर बायोलॉजी व रेडिएशन फिजिक्स आणि इतरही कर्करोगाच्या उपचाराशी संबंधित विषय शिकवले जातात.

