मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बरेच अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाले आहेत. त्यामुळे येथे आगीची घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे. डिकलने या यंत्रांना दुरुस्त करण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले. परंतु निवडक काम करून कंत्राटदार बेपत्ता झाला. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाईचे संकेत मेडिकलने दिले आहेत.
भंडारा, नागपूरसह इतरही काही शासकीय व खासगी रुग्णालयांत आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यात लहान मुलांपासून करोनाग्रस्तांपर्यंत विविध गटातील नागरिकांचा मृत्यूही नोंदवला गेला. या घटनानंतर शासनाने सगळ्या रुग्णालयांतील अग्निशमन अंकेक्षणाचे आदेश दिले. परंतु या अंकेक्षणानुसार बऱ्याच रुग्णालयांत अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झालेले दिसत आहेत. मेडिकलमधील यंत्र मुदतबाह्य झाल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. त्यानंतर मेडिकल प्रशासनाने निविदा प्रकाशित करून मुंबईतील कंत्राटदाराला काम दिले.
हे कामही सुरू झाले. परंतु कामात त्रुटी असल्याने अधिकाऱ्यांनी संबंधिताची कानउघाडणी केली. परंतु त्यानंतर कंत्राटदाराने काम थांबवले. या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कारवाईचे संकेत मेडिकलच्या अधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मेयोतील अधिष्ठाता कार्यालयातील यंत्रही कालबाह्य झाले आहे. त्यामुळे या यंत्रांवर देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी असलेले अधिकारी ते कालबाह्य होईस्तोवर काय करत होते, हा प्रश्न चर्चिला जात आहे. या विषयावर दोन्ही महाविद्यालयातील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.