नागपूर : नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील विनापरवाना उपाहारगृहावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनानेही त्यांच्या रुग्णालय परिसरातील लहान- मोठ्या उपाहारगृहांची झाडाझडती घेतली. या तपासणीत चारपैकी तब्बल तीन लहान-मोठी उपाहारगृहे आवश्यक परवान्याविनाच सुरू असल्याचे समोर आले. त्यापैकी एकाला तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उर्वरित दोघांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाच्या कारवाईचा हा इफेक्ट असल्याचे बोलले जाते.
मेडिकल प्रशासन अचानक सतर्क का झाले?
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यानंतर सदर विभागाच्या अन्न शाखेकडून राज्यभरातील हॉटेल, उपाहारगृहे आणि अन्न विक्री केंद्रांची तपासणी सुरू आहे. नागपुरातील मेयो रुग्णालयातीलही डॉक्टरांसाठी असलेल्या उपाहारगृहाकडे परवाना नसल्याचे आढळल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मेडिकल प्रशासनानेही आपल्या परिसरातील उपाहारगृहांची माहिती घेण्यास सुरुवात केली.
तपासणीत नेमके काय आढळले?
मेडिकलच्या क्ष-किरणशास्त्र विभागाच्या परिसरात डॉक्टरांसाठी नव्याने सुरू झालेल्या खासगी उपाहारगृहाच्या चालकाकडे आवश्यक अन्नविषयक परवाना नसल्याचे आढळले. त्यामुळे हे उपाहारगृह तातडीने बंद करून आवश्यक परवाना घेतल्यानंतरच पुन्हा सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले.
आणखी कोणती उपाहारगृहे परवान्याविना?
रुग्णालयाच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर महिलांकडून चालविली जाणारी दोन छोटी उपाहारगृहे आहेत. त्यांच्याकडेही आवश्यक परवाना नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यांना परवाना घेण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास ही उपाहारगृहे बंद होण्याची शक्यता आहे.
चारपैकी परवाना नेमका कुणाकडे?
मेडिकलमध्ये साऊथ इंडियन सोसायटीमार्फत चालविण्यात येणाऱ्या उपाहारगृहाकडे आवश्यक परवाना असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे चारपैकी केवळ हेच उपाहारगृह नियमानुसार सुरू असल्याचे समोर आले आहे.
हा विषय गंभीर का आहे?
मेडिकलमध्ये दररोज रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी आणि इतर मिळून १५ हजारांहून अधिक नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे येथे विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. परवान्याविना अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांना पाठीशी न घालता नियमांची अंमलबजावणी करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
प्रशासन काय म्हणते?
एका खासगी उपाहारगृहाकडे परवाना नसल्याने ते बंद करून परवाना घेतल्यानंतरच सुरू करण्याची सूचना केली आहे. अन्य दोन लहान उपाहारगृहांचीही माहिती घेतली जाईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य कारवाई केली जाईल. सर्वांना सुरक्षित अन्न मिळणे ही प्रशासनाची भूमिका आहे, अशी माहिती मेडिकल रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अविनाश गावंडे यांनी दिली.
