नागपूर : रेल्वे अपघातात उजवा पाय कापला गेल्याने नैराश्यात आलेल्या तृतिय पंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मेडिकलमध्ये उघडकीस आली. अस्थिरोग विभागातल्या वॉर्ड क्रमांक १८ मध्ये ही घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे.

राधिका मोहन जाधव (३५) असे वॉर्डातल्या खाटेवरच बँडेजने गळफास लावून आत्महत्या केलेल्या तृतियपंथीयाचे नाव आहे. राधीका ही मुळची अमरावती जिल्ह्यातील रहिवासी होती. अमरावती येथे झालेल्या रेल्वे अपघातात राधीका जाधव या तृतियपंथीयाचा पाय पूर्णपणे कापण्यात आला होता. सुरुवातीला अमरावतीतल्या इर्वीन रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी मेडिकलच्या अस्थिरोग विभागात दाखल करण्यात आले होते.

अपघातानंतर उजवा पाय कापला गेल्याने वेदना आणि मानसिक त्रासाशी राधीका झुंज देत होती. वॉर्डात ती गुरुवारी सकाळी खाटेवरच जखमा बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बँडेजने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. सकाळी सफाई करत असलेल्या कर्मचाऱ्याला हा प्रकार निदर्शनास आल्यान संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे. या घटनेनंतर रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्यामध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अजनी पोलिसांनी घटनेला दुजोरा दिला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

वॉर्ड क्रमांक १८ मध्ये खाटेवरच घेतला गळफास

माहिती मिळताच, अजनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. एप्रिल महिन्यात घडलेल्या एका भीषण रेल्वे अपघातात तिने आपला उजवा पाय पूर्णपणे गमावला होता. अपघातानंतर, ती सततच्या आणि असह्य वेदना व यातनांनी त्रस्त होती आणि दीर्घकाळापासून रुग्णालयात उपचार घेत होती. तीव्र नैराश्याच्या गर्तेत लोटली गेल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. राधिकाने वॉर्डमध्ये उपलब्ध बँडेज आणि वैद्यकीय पट्ट्यांचा वापर करून एक फास तयार केला; तो फास आपल्या रुग्णालयातील खाटेला बांधला आणि त्याचा वापर करून आपले जीवन संपवले.सध्या अजनी पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने आणि सखोल तपास करत आहेत.

आत्महत्येपूर्वी दिला व्हिडिओतून संदेश

अपघातानंतर पाय कापला गेल्याने नैराश्यात बुडालेल्या राधीका जाधव हिने आत्महत्येपूर्वी भ्रमणदूरध्वनीवर केलेल्या चित्रिकरणातून व्यथा मांडली. आधीच कुटुंब, समाजाने झिडकारले. त्यात आता अपघातामुळे जीवन उध्वस्त झाले. त्यामुळए आता जगण्यात अर्थ उरलेला नाही, अशा आशयाचा उल्लेख करत राधीकाने जीवनयात्रा संपवत असल्याची भावना मांडली. त्यानंतर जखमा बांधण्यासाठी वापरल्या जाणारे बँडेज आणि वैद्यकीय साहित्य गळ्याभोवती आवळून घेत तिने आत्महत्या केली.