अर्थसंकल्पात नागपूरला दिलासा; सुमतीताईंच्या नावाने महिला सक्षमीकरण योजना
मुख्यमंत्री नागपूरचे आणि अर्थमंत्री विदर्भाचे असल्याने युती शासनाच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या झोळीत भरभरून अर्थ पुरवठय़ाचे दान टाकण्यात आले आहे. नागपूरच्या बहुचर्चित नागपूर मेट्रो रेल्वेसाठी १८० कोटी, गोरेवाडा प्राणिसंग्रहालयासाठी ४० कोटींची तर महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी २१६ कोटींची आर्थिक तरतूद करून या प्रकल्पांना अर्थबळ देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या दिवंगत सुमतीताई सुकळीकर यांच्या नावाने महिला सक्षमीकरण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भात उद्योग उभारणीला चालना देण्यासाठी वीज दरात सवलत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दीड वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या विदर्भाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्यांनी नागपूरसह विदर्भाच्या इतरही भागांना भेटी देऊन अनेक घोषणा केल्या होत्या. फडणवीस ‘विकएण्ड’ला नागपुरातच येतात व विविध कार्यक्रमात विदर्भ विकासाचा संकल्प व्यक्त करतात. या पाश्र्वभूमीवर युती सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विदर्भाला विशेषत: नागपूरला काय मिळणार याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना या गोष्टींची जाणीव ठेवल्याचे दिसून येते.
गडकरी आणि फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे महामंडळाने सरकारकडे ५०० कोटींची मागणी केली होती, हे येथे उल्लेखनीय. केंद्रानेही या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य देऊ केले आहे. शहराच्याच नव्हे तर विदर्भ विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणाऱ्या मिहान प्रकल्पासाठी २१६ कोटींची तरतूद करून या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रेंगाळलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम तुटपुंजी असली तरी सरकार या प्रकल्पाप्रती गंभीर असल्याचे यातून दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘मेक इन महाराष्ट्रा’ची घोषणा करताना जास्तीत जास्त उद्योग नागपूर आणि विदर्भात कसे सुरू होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. मात्र विजेचा दर हा शेजारच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडपेक्षा महाराष्ट्रात अधिक असल्याने उद्योजक येत नव्हते, त्यामुळे राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाडा हा औद्योगिकदृष्टय़ा मागासलेला होता. या भागात उद्योग उभारणी व्हावी म्हणून शासनाने उद्योजकांना वीज सवलत देण्याची घोषणा केली होती.
नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून याबाबतचा अभ्यास करण्यात आला होता या समितीने अलीकडेच त्यांचा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली. याचा सर्वाधिक फायदा मिहानमध्ये येणाऱ्या मोठय़ा प्रकल्पांना होणार आहे. नागपूरसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.नागपूरसह पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्य़ांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी मालगुजार तलावाच्या दुरुस्तीसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करून सिंचनाच्या सोयींकडे लक्ष देण्यात आले आहे.
नागपूरला काय मिळाले
* मेट्रो रेल्वेसाठी १८० कोटी
* मिहानसाठी २१६ कोटींची तरतूद
* गोरेवाडा प्रकल्प ४० कोटी
* सीसीटीव्ही योजनेसाठी तरतूद
* नोकरदार महिलांसाठी विशेष बस
* नागपूर बसस्थानकाचा विकास
विदर्भाला काय मिळाले
* विदर्भातील उद्योजकांसाठी वीज दर सवलत
* माजी मालगुजार तलाव दुरुस्तीसाठी १५० कोटी
* बुलढाण्यात शासकीय कृषी महाविद्यालय
* अकोल्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय
* चंद्रपूर, अमरावती अकोला विमानतळ विकास
* हनुमान व्यायम प्रसारक मंडळासाठी १ कोटी
* नवीन चंद्रपूरसाठी म्हाडा विशेष प्राधिकरण

सुमतीताईंची आठवण
राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या आदरस्थानी असलेल्या नागपूरच्या भाजप नेत्या दिवंगत सुमतीताई सुकळीकर यांच्या सेवाकार्याची आठवण ठेवून युती सरकारने त्यांच्या नावाने महिला सक्षमीकरण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना शून्य टक्के दराने कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.