नागपूर ; विमानाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी मिहान प्रकल्पाला लागून सुरू करण्यात आलेल्या इंडेमार प्रकल्पात शनिवारी सकाळी भीषण घटना घडली. दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाला आत प्रवेश करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असताना लोखंडी दरवाजा उघडताना त्याचा तोल गेला. वजनी गेट अंगावर येऊन कोसळल्याने त्या खाली दबल्या गेलेल्या दोन पैकी एका सुरक्षा रक्षकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
सोनेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रिय विमानतळाच्या धावपट्टीला लागून असलेल्या मिहान सेझ प्रकल्पातील इंडेमार प्रकल्पात शनिवारी सकाळी सव्वा दहा ते साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. कैलास चाफेकर असे लोखंडी गेट अंगावर कोसळून त्या खाली दाबल्या गेलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात आणखी एक सुरक्षा रक्षक अरमान प्रधान हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रिय विमानतळावर येणाऱ्या विमानांची देखभाल आणि किरकोळ दुरुस्तीचे काम या समुलाला मिळाले आहे. शिवणगाव परिसरातील विमानतळाला लागून असलेल्या धावपट्टीला लागून या समुहाचा प्रकल्प आहे. येथे आलेल्या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याने शनिवारी त्याची इंडेमारमध्ये देखभाल दुरुस्ती केली जाणार होती. त्यासाठी सकाळी समुहातील ३ एच. १ येथील लोखंडी गेट उघडले जाणार होते. सकाळी गेट उघडत असताना परिसरात ६ सुरक्षा रक्षक तैनात होते. गेटचा एक भाग उघडत असताना अचानक वजनामुळे या वजनी लोखंडी गेटचा तोल गेला. त्याच वेळी एका दिशेने उभे असलेले दोन सुरक्षा रक्षक कैलास चाफेकर आणि अरमान प्रधान त्याच्याखाली दाबले गेले. वजनी गेट अचानक अंगावर पडल्याने दोघेही खाली चेपले गेले. दरम्यान सोनेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांच्या मदतीने अन्य कामगारांनी धावपळ करत गेट बाजूला केले आणि जखमी कैलास चाफेकर, अरमान प्रधान यांचा तातडीने एम्समध्ये दाखल केले. डॉक्टरांनी कैलास यांना तपासत मृत घोषित केले. दरम्यान प्रधान यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काय काम करते इंडेमार कंपनी…
इंडेमार एव्हिएशन ही भारतातील सर्वात जुन्या आणि अग्रगण्य विमानसेवा कंपन्यांपैकी एक असून, तिची स्थापना १९४७ मध्ये झाली. ही कंपनी विमाने आणि हेलिकॉप्टर्सची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सेवा पुरवते. तिचे मुख्य आणि अत्याधुनिक एमआरओ हँगर्स नागपूरातील मिहान सेझ आणि नवी दिल्ली येथे आहेत. ही कंपनी बॉम्बार्डियर, एम्ब्रेर आणि ऑगस्टावेस्टलँड यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या विमानांना तांत्रिक सेवा पुरवते.
