नागपूर : काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांचा रोबोट नावाचा सिनेमा पडद्यावर आला होता. यात रोबोट देशासाठी उपयुक्त ठरू शकते, यावर प्रकाश टाकतानाच त्याच्या उपद्रवाची बाजू मांडण्यात आली होती. नावीन्यपूर्ण कथानकामुळे सिनेरसिकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. येत्या काळात रोबोट प्रत्यक्षात भारताच्या सीमेच्या संरक्षण करताना दिसणार आहे. त्याचा पाया नागपुरात रचण्यात आला आहे.
उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात देशाचे सैन्य चीनच्या सीमेवर उभे आहे. यापूर्वी भारत व चीनचे सैन्य समोरासमोर संरक्षण करत होते. मागील काही महिन्यांपासून चीनकडून सैन्य नव्हे तर सीमेच्या संरक्षणासाठी चिनी रोबोट दिसत असून रोबोट सीमेचे संरक्षण करीत आहे. याचप्रकारे भारतासाठी लागणारे रोबोट नागपुरात ‘सोलर’ कंपनी तयार करणार आहे. मागील आठवड्यात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रोबोट निर्मिती प्रकल्पाचा नागपुरातील मिहानमध्ये पाया रचण्यात आला. देशाच्या संरक्षणासाठी नागपूरचे यापेक्षा मोठे योगदान असूच शकत नाही, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मिहान ‘सेझ’मध्ये सोलर डिफेन्स व एअरोस्पेस लिमिटेडच्या रोबोटिक्स व यूएव्ही सुविधांसाठी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भूमीपूजन केले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे अर्थराज्यमंत्री आशीष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, ‘सोलर’चे चेअरमन सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता एक नवी जागतिक व्यवस्था तयार होत आहे. प्रत्येक ठिकाणी शस्त्राचा वापर व व्यापार होत आहे. संरक्षण क्षेत्रातील पुरवठ्याचे मार्ग संकटात आहे. अशा स्थितीत ज्या देशाकडे रणनीती व तांत्रिक बळ असेल, तेच देश या नव्या जागतिक व्यवस्थेत आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करू शकतील.
आजच्या भूमीपूजनातून त्याच दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र सरकारने संरक्षण व एअरोस्पेस धोरण तयार केले. गुंतवणुकीसाठी धोरण आखले. या धोरणानुसार सर्वात मोठी गुंतवणूक आज ‘सोलर’ ग्रुपच्या मध्यमातून येत आहे. या बदलत्या जगात विशेष करून कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), सेमी कंडक्टर पर्यावरणीय प्रणालीमुळे जगातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. बदलत्या काळात एक हजार दिवसांत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीचे तंत्र बदलणार आहे. यात भारत स्वत:ची ताकद उभी करण्यासाठीची ही आज एक झलक आहे. येथे अत्याधुनिक रोबोट तयार होतील, असे ते म्हणाले. आताचे सर्व युद्ध ड्रोनद्वारेच लढले जात आहे. आता वेगवेगळ्या प्रकारच्या सशस्त्र ड्रोनचा वापर होत आहे. ड्रोननिर्मितीचे तंत्रज्ञानही प्रगत असून त्यानुसार निर्मिती करण्याचे काम ‘सोलर’द्वारे करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान केवळ युद्धाच्या कामात येते, असा अनेकांचा समज आहे. युद्धासाठी आवश्यक आहेच, परंतु सर्व उत्पादन क्षेत्र त्या बळावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रात आवश्यक उत्पादनाचे हब नागपूर
संरक्षण क्षेत्रातील भविष्यातील तंत्रज्ञानाशी हा प्रकल्प जोडलेला आहे. येथील उत्पादने देशात व जगात जातील. शहरातील नागरिक जागतिक स्तरावर कामगिरी करतात, तेंव्हा शहरातील प्रत्येक नागरिकाचा मान वाढतो. संरक्षण क्षेत्रात आवश्यक उत्पादनाचे हब नागपूर बनत आहे. यात ‘सोलर’चे मोठे योगदान आहे. मिहान प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस व माझ्याकडून लोकांना अपेक्षा होत्या. आज मिहानमध्ये लाखो तरुणांना रोजगार मिळत आहे. येथे मोठी गुंतवणूक येत आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होत आहे. विदर्भाचा विकास सतत होत असल्याचे ते म्हणाले.
चीनच्या रोबोट्सचे वैशिष्ट्य
इंटरेस्टिंग इंजिनीअरिंगच्या रिपोर्टनुसार, चीनच्या सीमेवर तैनात करण्यात येणाऱ्या रोबोचे नाव ‘वॉकर एस -२’ आहे. हे मागील वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आले होते. त्याची उंची सुमारे १.७६ मीटर आहे. त्याचे हात व पाय अतिशय लवचिक असून त्याला ५२ सांधे आहेत. हातात ११-११ सांधे असतात, जे खूप बारीक काम करू शकतात. हे १५ किलोपर्यंत वाहून नेऊ शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्याची बॅटरी संपते तेव्हा ती स्वयंचलितपणे नवीन बॅटरी स्थापित करते. फक्त तीन मिनिटांत बॅटरी बदलते, त्यामुळे रात्रंदिवस काम करता येते.
