नागपूर : सरकारी अधिकार्‍याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी निर्भय उर्फ आकाश पाखरे याच्याकडून पोलिसांना तपासातील असहकार्य तीन दिवस झाले तरी कायम आहे. पोलीस कोठडीत आता त्याने पिझ्झा, मऊ बिछाना आणि व्हीआयपी सोयीसुविधांचा हट्ट धरला आहे.

१६ वर्षीय मुलीच्या कथित अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक निर्भय पाखरे याने कोठडीतील अस्वच्छ भिंती आणि दुर्गंधीयुक्त शौचालयाबद्दल कुरबुरी करण्यास सुरुवात केली आहे. त्याने नाश्त्यासाठी पिझ्झा आणि रात्रीच्या जेवणासाठी उत्तम जेवणाची मागणी सुरू केली आहे.

मंगळवारी न्यायालयात त्याच्या वकिलांनी पोलिसांवर अरेरावीचा आरोप केल्यानंतर, तो पोलीस कोठडीतील चौकशीसही नकार देत आहे. त्यामुळे पोलीस पेचात सापडले आहेत.

वैद्यकीय तपासणी आणि उपचारांना तसेच भ्रमणध्वनीचा पासवर्ड देण्यासही नकार

हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी सांगितले या आरोपीने, पकडल्यापासून पोलिसांना तपासात कोणतेही सहकार्य केलेले नाही. त्याने आपला भ्रमणध्वनीचा पासवर्ड आणि पीडितेचा मोबाईल देण्यासही नकार दिला. जो त्याने हिसकावला होता. त्यामुळे पोलीस डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी धडपडत असताना, हा तरुण मात्र कौशल्याने प्रश्नांना बगल देत आहे.

जबरदस्तीने वैद्यकीय तपासणी

“आरोपी व्हीआयपी वागणुकीच्या वारंवार मागण्या करून लॉक-अप कर्मचाऱ्यांना सतत त्रास देत आहे. तो रात्रीची झोप न लागणे, डासांचे चावे याबद्दलही कुरकुर करत आहे. त्याने कोठडीत जाड गादी, मऊ बिछाना आणि कीटकनाशक फवारणीची मागणी केली आहे,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांशी सतत वाद

पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, आरोपी अधिकाऱ्यांशी रात्रंदिवस वाद घालत आहे. तो लैंगिक शोषणासाठी १६ वर्षीय मुलीला जबाबदार धरत आहे.

आपले ७० हजार चोरल्याचा पोलिसांवर आरोप

आरोपीने मंगळवारी विशेष न्यायाधीशांसमोर पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमधून ७०,००० रुपये चोरले, मारहाण केली आणि चष्मा व बूट परत करण्यास नकार दिला, असा आरोप त्याने केला. त्यावर त्याच्या वकिलांनी हा तरुण स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल अशी बाजू मांडली होती.

हुडकेश्वर पोलिसांची २४ तास पाळत

या बाबत हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक अनामिका मिर्झापुरे म्हणाल्या त्यांनी आरोपीला सहकार्य केले आहे. मात्र तो कोठडीत आलिशान सोयी, मऊ बिछाने, उत्तम जेवणाची मागणी करत असेल आणि सतत वाद घालत असेल, तर आम्ही मदत करू शकत नाही. आरोपी चौकशी टाळत आहे आणि सहकार्य करण्यास नकार देत आहे. आम्ही सतत समुपदेशन करत आहोत, आरोपीने आत्मघात करण्याचा प्रयत्न करू नये यासाठी त्याच्यावर २४ तास पाळत ठेवली जात आहे.