नागपूर : हुडकेश्वर येथील शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीचे झालेले अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाबी पोलिसांच्या तपासातून समोर आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला ठाणे येथील आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे याने बनावट ओळखपत्राच्या आधारे आधी आपली ओळख लपवली. डार्क नेटवरून मुलीच्या अत्याचाराची योजना आखली. पाशवीपद्धतीने तिच्यावर अत्याचारानंतर जीवे मारण्याचा कटही रचल्याचा धक्कादायक उलगडा बुधवारी झाला.
बनावट ओळपत्राद्वारे तयार केले खाते…
बनावट ओळखपत्राच्या आधारे आरोपी निर्भय पाखरे याने डार्क वेबवरून इंटरनेट खाते तयार केले. या माध्यमातून त्याने ‘आकाश मेहरा’ नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केला. या आयडीवरून त्याने आधी नागपुरातील एका अल्पवयीन मुलीशी संपर्क साधला. तिच्या मार्फत त्याने आणखी दुसऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. भावनिकरीत्या तिच्याशी संवाद साधत आकाशने तिच्या इन्स्टाग्राम खात्याचा गुप्त क्रमांक मिळवला. यावरून त्याने स्वतःच तिच्या नावाने बनावट आणि आक्षेपार्ह संदेश पाठवत तिला ‘ब्लॅकमेल’ केले. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने हा प्रकार आई-वडिलांपासून लपवून ठेवला.
अशी घडली घटना…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा कट रचत आकाश रविवारी ठाण्यावरून नागपुरात आला. नागपुरात येण्यापूर्वी त्याने ‘९९ एकर’ या संकेतस्थळावरून दिघोरी भागातील निर्जन ठिकाणी एक खोली भाड्याने घेतली. खोली पूर्णतः एकाकी असेल, असे ठिकाण त्याने निवडले. कटानुसार आकाशने तिला आधी रविवारी सकाळी इंटरनेटवरून संपर्क साधत भेटायला बोलवले. तिचा भ्रमणध्वनी हिसकावत तिला खोलीवर नेले. दुपारपर्यंत खोलीवर हातपाय आणि तोंड बांधून ठेवत त्याने चाकूच्या धाकावर तिच्यावर अत्याचार केला.
फोन सुरू केला आणि सुगावा लागला
रात्र झाली तरी मुलगी घरी आली नसल्याने आई-वडिलांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. निर्भयने तिला खोलीत कोंडल्यानंतर रात्रभर तिच्यावर अत्याचार केला. दुपारपर्यंत माग काढत पोलीस त्याच्या ठाणे येथील घरी पोहोचल्याने निर्भयच्या आईने त्याला संपर्क साधत सावध केले. दरम्यान, आकाशने दुपारी मुलीचा फोन सुरू करत तिला आई-वडिलांच्या नावाने आपण सुरक्षित असल्याचा ध्वनीसंदेश पाठवण्यास भाग पाडले. चाकूच्या धाकावर त्याने मुलीला हा संदेश पाठवायला लावला. नेमका इथेच निर्भय सापडला. त्याने फोन सुरू करताच सायंकाळपर्यंत पोलिसांनी त्याचे ठिकाण शोधून काढले.
घटनास्थळाचे दृष्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का
अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर निर्भयने ज्या खोलीत तिला बांधून ठेवून अत्याचार केला त्या खोलीचा दरवाजा तोडून आत शिरलेल्या पोलिसांना तेथील दृष्य पाहून धक्काच बसला. निर्भयने अत्यंत क्रूरपणे तिचे हात-पाय बांधून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. अत्याचारानंतर मुलीची हत्या करण्याचा कट त्याने रचला होता. यासाठी त्याने मुलीच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने वार केले होते. त्यामुळे मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत होती. निर्भयच्या बँगची झडती घेतली असता पोलिसांना त्यात अश्लिल साहित्य आणि हत्येसाठी निर्भयने आणलेले तिन चाकू सापडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत न्यायवैद्यक पथकाला घटनास्थळी पाचारण केले आणि नमूने गोळा केले.
आयपीएस अधिकाऱ्याकडून दबाव
निर्भयची आई ठाणे येथे मानसोपचार तज्ज्ञ असल्याची माहिती मिळत आहे. मुलाला पोलिसांनी अटक केल्याचे कळताच ती नातेवाईक असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यामार्फत पोलिसांवर दबाव टाकत असल्याचीही माहिती मिळत आहे. निर्भयला न्यायालयातून जामीन मिळावा यासाठी मोठ्या वकिलांमार्फत दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे.
दबाव सहन केला जाणार नाही
खरी ओळख लपवत आरोपीने अत्यंत योजनाबद्धरीत्या हा कट रचला. कटाचे एकेक पदर पोलीस तपासातून उलगडत आहेत. अपहृत आणि अत्याचार पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्यापुढे सगळे समान आहेत. त्यामुळे तपासावर कोणाचाही दबाव असण्याचे कारणच नाही, ते सहनही केले जाणार नाही, असे पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी स्पष्ट केले.
