नागपूर : धंतोली येथील बलराज मार्गावरील निवासी संकूल परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबातील पाचही जणांचा अखेर बुधवारी सुगावा लागला. हे कुटुंब पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे सुखरुप सापडले आहे. बँकेत केलेल्या व्यवहारानंतर या कुटुंबापर्यंत पोहोचण्यात नागपूर आणि पुणे पोलिसांच्या तपासपथकाला यश आले. नरेश परसवानी यांच्या कुटुबातील पत्नी हर्षा, त्यांचा मुलगा जितेंद्र, सुन इशिता, नात खुशी आणि नातू कृष्णा परतवानी हे पाचही जण २६ जूनला कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. दहा दिवस कुटुंबातल्या सदस्यांशी कसलाही संपर्क होत नसल्याने मोठ्या भावाने धंतोली पोलीस ठाणे गाठत कुटुंबातील पाचही जण बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.
बँक व्यहारामुळे लागला सुगावा…
कुटुंबातील सर्व सदस्यांचे भ्रमणध्वनी बंद येत असल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. परसवानी कुटुंबातील सदस्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने पोलिसांनी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या बँक खात्यांवरही तपासाची नजर केंद्रीत केली होती. दरम्यान परसवानी कुटुंबातील जितेंद्र यांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड येथील एका एटीएममधून रोख रक्कम काढली. त्याच्या काही वेळेनंतर जी- पे या ऑनलाईन अॅपवरून काही वस्तू खरेदी केल्या. त्यामुळे कुटुंबाचा ठावठिकाणा शोधत असताना हे दोन्ही व्यवहार पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा धागा ठरला. या डिजिटल व्यवहारातून कुटुंबाचे लोकेशन पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे निष्प्न झाल्याने पोलिसांचे विशेष पथक बुधवारी तातडीने पिंपरी चिंचवड येथेही पोहोचले.
३० लाखांचे झाले होते कर्ज
जितेंद्र परसवानी यांचे जयताळा चौकात जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. त्या व्यवसायासाठी जितेंद्र यांनी अनेकांकडून उसने पैसे आणि कर्ज घेतले होते. यातून ३० लाखांहून अधिक रकमेच्या कर्जाचा डोंगर तयार झाला. याच आर्थिक तणावातून त्यांनी नागपूर सोडून पिंपरी चिंचवड येथील वैभव नगरात नातेवाईकांकडे आश्रय घेतला होता.
अखेर मंगळवारी केलेल्या बँक व्यवहारामुळे ठावठिकाणा सापडल्याने धंतोली पोलिसांच्या पथकाने वैभवनगरातून कुटुंबाला गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांनी जितेंद्रचे संपर्क साधत बेपत्ता होण्याचे कारण विचारले असता, कर्जबाजारीपणामुळेच घर सोडल्याचे त्याने मान्य केले. त्यामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
