नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मूळ अमरावतीचे असलेले डॉ. पोतदार नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाले आहेत. त्यांनी गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली असून १९९४ पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक होत असलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात अनेक दावेदार होते. परंतु गेली ४० वर्षे अनेकदा अपयश येऊनही ग्रामीण भागात भाजपचे संघटन वाढविण्यासाठी त्यांनी सतत परिश्रम घेतले. भाजपच्या केंद्रीय समितीने त्यांच्या नावावर रविवारी रात्री शिक्कामोर्तब केले. आज सोमवारी त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला अन एका निष्ठावंताला न्याय मिळाल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

अर्ज दाखल करताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महापौर निता ठाकरे, शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले डॉ. पोतदार यांनी १९९४ पासून राजकीय कारकिर्द सुरू केली. १९९५-१९९९ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना युतीचा गावोगावी प्रचार केला. अमरावती जिल्ह्यातील खोलापूर येथे जन्मलेल्या डॉ. पोतदार यांनी कळमेश्वर हेच कर्मभूमी निवडली. २००२ मध्ये त्यांनी कळमेश्वर नगर पालिकेत ९ सदस्य निवडून आणत भाजप-शिवसेना युतीचे सत्ता आणली. त्यांना कळमेश्वर नगर पालिकेत नामनिर्देशित सदस्य म्हणून पक्षाने संधी दिली.

भाजपच्या विविध पदावर राहून पाडली छाप

त्यांनी जिल्हा भाजपच्या विविध पदावर राहून आपली छाप पाडली. शांत, संयमी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. पोतदार यांनी २००३ ते २००९ पर्यंत जिल्हा भाजपचे महामंत्री म्हणून संघटनेचा ग्रामीण भागात विस्तार केला. २००९ ते २०१२ ते भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तर २०१३ ते २०१९ पर्यंत ते नागपूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष होेते. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे निवडणूक प्रमुख होते. संपूर्ण मतदार संघाचे व्यवस्थापन त्यांच्याकडे होते.

त्यांना भाजपने २०१९ मध्ये सावनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीही दिली. त्यांना ८७ हजार मते पडली होती. त्यांचा विजय थोडक्यात हुकला होता. दोन वर्षांपूर्वी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीची त्यांना अपेक्षा होती. परंतु त्यांची निराशा झाली. अखेर पक्षाने त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून उमेदवारी देत बावनकुळे यांचा वारसदार म्हणून निवड केली. ते सहकार क्षेत्रातही कार्यरत असून कळमेश्वर नागरिक सहकारी पतसंस्थेची त्यांनी स्थापना केली. आज या संस्थेची उलाढाल १०० कोटींवर आहे. ते शैक्षणिक, क्रीडा, कृषी या क्षेत्रातही कार्यरत आहेत.