नागपूर : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १८ जूनला मतदान होणार असून २२ जूनला मोजणी आहे. परंतु काही ठिकाणच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु काही ठिकाणी निवडणुका होत आहे. नागपुरातही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप मतदारांचे संख्याबळ जास्त असल्याने विजय जवळपास निश्चित असल्याची चर्चा होत आहे. परंतु भाजपने आपले मतदार (नगरसेवक) बाहेर फिरायला नेलेत. ते स्व:खर्चाने गेले असून आचारसंहितेची सुट्टी असल्याने बाहेर गेल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले.
मी अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु…
यावर काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी टीका केली. मी ही लोकसभा निवडणूक लढलो. विधानसभा निवडणूक पाहिली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकाही पाहिल्यात. परंतु आचार संहितेत सुट्टी असते, हे पहिल्यांदाच कळले. ही नवीन माहिती आहे. याबाबतच माहिती घ्यावी लागेल. कायदे तपासावे लागतील, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री अनिल देशमुख, उमेदवार अतुल लोंढे, शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अश्विन बैस, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी जि.प. उपाध्यक्षा कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे, शिवसेना (उबाठा) नगसेवक किशोर कुमेरिया आदी उपस्थित होते.
भाजपला नगरसेवक फुटण्याची भीती
खासादर बर्वे म्हणाले की, भाजपने निवडणुका बिनविरोध करण्यासाठी दबावाचा वापर केला. काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु नागपुरात तसे करण्यात त्यांना अपयश आले. आमचा उमेदवार रिंगणात आहेत. नागपुरात त्यांना यश आले नाही. संख्याबळ जास्त असल्याने भाजपकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. परंतु त्यांना त्याचे मतदार फुटण्याची भीती आहे. त्यामुळेच भाजप नगरसेवकांना दुसऱ्या राज्यात घेऊन गेल्याचे ते म्हणाले. आम्हाला मतदार फुटण्याची भीती नाही. त्यामुळेच आमचे नगरसेवक मतदार संघातच असून नागरिकांचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. आमच्याकडचा आकडा वाढलेला असेल, असा दावाही त्यांनी केला.
भाजप ओबीसीविरोधी – गुडधे
भाजपचे ओबीसी विरोधी आहे. याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. कॉंग्रेसचा उमेदवार ओबीसी आहे. भाजप उमेदवार हे आरएसएसच्या विचारसरणीचे आहे. त्यांची विचारसरणीही ओबीसी विरोधी आहे. त्यामुळे ओबीसी उमेदवाराल मतदान झाले पाहिजे, असे कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे म्हणाले. तर चांगली संधी असेल तर भाजप ओबीसीला डावलतात, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.
