नागपूर : राज्याच्या वनखात्याकडूनच वनसंरक्षण कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे नियम व तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा मांगर्ली या संरक्षित क्षेत्राला चार वर्षांपूर्वी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात आला होता. वाघांच्या प्रजननासाठी हे क्षेत्र ओळखले जाते. मात्र, या संरक्षित क्षेत्रात नियम आणि कायद्यांची पायमल्ली करत दोनमजली विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे. याआधीही याठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उपक्रम राबवण्यात आले.

माेगरकसा मांगर्ली हे वाघांच्या प्रजननासाठी ओळखले जाते. ११२ प्रकारच्या मशरुमच्या प्रजातींसह इतरही दुर्मिळ अशी जैवविविधता याठिकाणी आहे. मात्र, या संवर्धन राखीव क्षेत्रातील मोठ्या तलावाजवळच मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामामुळे पाण्याची ऑक्सीजन पातळी कमी झाली आहे. प्रजनन करणाऱ्या वाघांनी त्यांचा मोर्चा इतरत्र वळवल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मानव-वाघ संघर्ष निर्माण झाला आहे. हा ऱ्हास होत असतानादेखील याठिकाणी वनसंवर्धन कायद्याचे उल्लंघन करुन नवीन विश्रामगृह बांधण्यात येत आहे. नवीन विश्रामगृह बांधताना वनविभागाने तसा प्रस्ताव करुन केंद्राची मंजूरी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी ही मंजूरी घेण्यात आली नाही.

राज्यातील सर्वच वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. या क्षेत्रात एक जुने वारसा विश्रामगृह आहे. तर त्याच्या बाजूलाच काही वर्षांपूर्वी आणखी एक विश्रामगृह बांधण्यात आले. मात्र, हे जुने वारसा विश्रामगृह पाडून त्याठिकाणी नवीन दोनमजली विश्रामगृह बांधण्याचा घाट वनविभागाने घातला आहे. त्यासाठी निविदा देखील काढण्यात आली. हा सर्व घाट एका राजकीय नेतृत्त्वाच्या आग्रहाखातर घातला जात असल्याची चर्चा वनखात्याच्याच वर्तुळात आहे. त्यांच्याच आग्रहामुळे याठिकाणी सफारी सुरू करण्यात आली. पर्यटकांसाठी याठिकाणी अनाधिकृत पक्के बांधकाम असणारे सर्वसुविधायुक्त पर्यटन कुटीर(कॉटेज) बांधण्यात आले आहेत. वनरक्षक, वनपालाच्या शासकीय निवासस्थानी उपहारगृह सुरू करण्यात आले. या सर्व घडामोडी कायद्याचे उल्लंघन करुन करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) एम. श्रीनिवास राव यांनी, या वनाधारित घडामोडी आहेत. त्यामुळे यासाठी परवानगी लागत नाही, असे सांगितले.

संरक्षित क्षेत्रात वन्यजीव संरक्षण कायदा, वनसंवर्धन कायदा आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनातील नियम आणि तरतुदीनुसार संरक्षण कुटीशिवाय कोणतेही पक्के आणि मोठे बांधकाम करता येत नाही. ते आवश्यक असल्यास वनसंवर्धन कायद्याची मंजूरी आवश्यक ठरते आणि त्यासाठी आधी प्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र, नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा मांगर्ली हे संरक्षित क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करुनही याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला अनुकूल असे व्यावसायिक उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्य वन्यजीव मंडळाने हे क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे त्याला अभयारण्याचे अनेक कलम लागू होतात.

मोगरकसा येथे रात्रंदिवस विनापरवानगी वाहने फिरत असतात. यात राजकीय नेतृत्वाचे नातेवाईक, मित्रमंडळींचाही समावेश आहे. दोन महिन्यांपूर्वी या परिसरातील वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. मात्र, याच राजकीय दबावामुळे पर्यटक वाहनचालक आणि पर्यटक मार्गदर्शकाने वरिष्ठांपासून ही बाब लपवली. दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच व्यक्तीने वनखात्याला माहिती दिली. तोपर्यंत बछड्याचे शव जागेवरुन बेपत्ता झाले. मात्र, अजूनही या प्रकरणाचा छडा वनखात्याला लावता आला नाही.