नागपूर : शहरातील रस्त्यावर आधीच खड्डे पडले आहे. यातच विविध ठिकाणी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्ते खड्डेमय झाले असून त्याचा त्रास वाहन चालक, सामान्य नागरिकांना होतो. विशेष म्हणजे पावसाळ्यात खोदकाम करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु या सूचनांकडे महापालिका आणि अन्य प्राधिकरणांकडून दुर्लक्ष होत असल्याचे शहरातील विविध भागांतील चित्रावरून दिसून येते. पाईपलाइन, मलनिस्सारण वाहिन्या, पाणीपुरवठा दुरुस्ती तसेच भूमिगत केबल टाकण्यासाठी अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात रस्ते खोदण्यात येत आहेत. खोदकामातील माती रस्त्यावर येत असल्याने पावसाच्या पाण्यामुळे हे रस्ते चिखलमय होत आहेत. आधीच खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत त्यामुळे आणखी भर पडली आहे. परंतु प्रशासनाला सामान्य नागरिकांच्या त्रासाचे काही देणे घेणे नसल्याचे दिसते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सानू भगत नामक व्यक्ती म्हणाले की, अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहेत. याचा मोठा त्रास होतो. पाऊस जारोत असल्यास समोरचे दिसत नाही. अशा वेळी अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे खोदकामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही, अशी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
अमित चौधरी नामक व्यक्ती म्हणाला की, महापालिकेला सामान्य नागरिकांशी काही देणे घेणे नाही. एकाच ठिकाणी दोन-दोनदा कामे करण्यात येते. प्रशासनाने कामाकडे लक्ष दिले पाहिजे. खोदकामाचा मोठा त्रास होतो. त्यामुळे पावसाळ्यात अशी कामे टाळली पाहिजे, असे ते म्हणाले.
शहराच्या विविध भागात खोदकाम सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक खोदकाम हे ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले. तर पावसाळ्यात खोदाकाम करू नये, असे निर्देश न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत. परंतु त्यानंतरही कामे सुरू आहेत. काही कामे मलनिस्सारण वाहिणीचे आहेत. अमृत योजनेंतर्गत हे काम करण्यात येत आहे. तर काही कामे पाणी लाइन दुरुस्ती तर काही ठिकाणी भूमिगत केबल टाकण्यासाठी करण्यात येत आहे. ही कामे महापालिकेसह नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतरही प्राधिकरणाकडूून करण्यात येत आहे. एकाविभागाची माहिती दुसऱ्या विभागाला माहिती नसल्याचे दिसते. शहरात अनेक भागात आधीच खड्डे आहेत. त्यामुळे नागरिकांना यातून वाहन चालवणे चांगलेच जिकरीचे होते. त्यात या खोदकामामुळे माती रस्त्यावर येत आहे. संपूर्ण रस्ताच मातीमय झाल्याचे चित्र आहे. पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल होतो. वाहन चालकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. पायी चालणाऱ्यांची मोठी अडचण होते.
मयंक नामक शाळाकरी मुलांना सांगितले की, रस्त्यावरील चिखलाचा मोठा त्रास होतो. वाहनामुळे उडणाऱ्या चिखलामुळे त्यांचे कपडे खराब होण्याची भीती असते. अनेकदा चिखल कपड्यावरही उडतो. त्यामुळे घरच्याचा शाब्दीक मार खावा लागतो. चिखल रस्त्यावर होणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. ज्यामुळे आमचे कपडे होणार नाही, असा तो म्हणाला.
अनिकेत कुत्तरमारे म्हणाला की, खोदाकामामुळे रस्त्यावर माती येते. या मातीमय रस्त्यामुळे वाहनचालकही पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात खोदकाम टाळले पोहिजे, असे ते म्हणाले.
नागरिकांचा आरोप
काही ठिकाणी रस्ते खराब असल्याने त्यावर डांबरीकरण करून गुळगुळीत करण्यात आले. परंतु वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते खोदून पुन्हा खराब करण्यात येत आहे. खोदकामामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहे. शिवाय दुरुस्तीच्या नावे पुन्हा यावर लाखो, कोट्यवधींचा खर्च करण्यात येईल. त्यामुळे विकास कामांच्या नावावर फक्त खोदकामच करून पुन्हा दुरुस्ती करून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे हित जोपासण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
समन्वयाचा अभाव
अमृत योजना आणि इतर योजनांचे काम नियोजित आहे. त्याचा आराखडाच मंजूर आहे. त्यामुळे रस्त्या खोदण्यात येणार असल्याचे पूर्व नियोजित आहे. असे असतानाही संबंधित रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले किंवा त्याची दुरुस्ती करण्यात आली. तर काही ठिकाणी रस्ते सिमेंटचे करण्यात आले. आता दुसऱ्या विभागाकडून त्यांच्या कामासाठी पुन्हा खोदण्यात येत आहे. त्यामुळे दोन विभागात समन्वय व नियोजनाचा अभाव दिसते. त्याचा फटका नागरिकांना बसत असून पैसाही व्यर्थ जात असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
दोषींवर कारवाई झाली पाहिजे
संदेश नामक व्यक्ती म्हणाला की, कुठे, कोणती कामे करायची आहे, हे अधिकाऱ्यांना माहिती असते. त्यानंतरही नवीन रस्ते तयार करून ते पुन्हा खोदण्यात येते. विशेष म्हणजे पावसाळ्यात कंत्राटदारांनी केलेले निकृष्ट कामावर पांघरून घालण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात येते. त्यामुळे रस्ता तयार केल्यावर वर्षभारत खोदकाम करण्यात येत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
