नागपूर : नागपूरहून रद्द झालेल्या एअर इंडियाच्या विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता एअर इंडिया आपला ‘कात्री’ प्रयोग मागे घेणार का, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
औद्योगिक विकासाला मोठा फटका
नागपूर हे सध्याच्या काळात वेगाने विकसित होत असलेले देशातील प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स केंद्र आहे. त्यामुळे येथील हवाई संपर्कात कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असे गडकरी यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले. नागपूर-मुंबई मार्गावरील महत्त्वपूर्ण विमानसेवा कमी केल्यामुळे किंवा रद्द केल्यामुळे व्यावसायिक प्रवास, औद्योगिक उपक्रम, नवीन गुंतवणुकीच्या संधी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयींवर अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने नागपूरच्या उद्योजकांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे.
निर्णयाचा तातडीने पुनर्विचार व्हावा
मुंबईशी असलेला सक्षम संपर्क विदर्भाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे सांगत, एअर इंडियाने आपल्या या विमानसेवा बंद करण्याच्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी गडकरी यांनी केली. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी किमान एक नागपूर-मुंबई विमानसेवा तरी पूर्ववत सुरू करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक संपर्क, आर्थिक विकास आणि जनसुविधांच्या दृष्टीने हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
विमान वाहतुकीचे मोठे केंद्र
भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात नागपूरचे भौगोलिक आणि व्यावसायिक महत्त्व सातत्याने वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सध्या सुरू असलेल्या आधुनिकीकरण आणि विस्तारकामांचा विशेष उल्लेख करत, नागपूर हे भविष्यातील प्रमुख विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येत आहे, याकडे गडकरी यांनी एअर इंडियाच्या प्रशासनाचे लक्ष वेधले.
‘एआयडी’ संघटनेकडून चिंता व्यक्त
असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलमेंट (एआयडी) या संघटनेने यापूर्वीच विमानसेवा कमी करण्याबाबत चिंता व्यक्त करून गडकरी यांना निवेदन सादर केले होते. विदर्भातील प्रवासी, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी सक्षम हवाई संपर्क अत्यावश्यक असल्याचे एआयडीने म्हटले आहे. गडकरी यांच्या भक्कम हस्तक्षेपामुळे टाटा समूह आणि एअर इंडिया प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि या विमानसेवा लवकरात लवकर पूर्ववत केल्या जातील, असा विश्वास आता विदर्भातील उद्योग जगतातून व्यक्त होत आहे.
