नागपूर : सेवाग्राम स्थानकावर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या उभारणीसाठी ३० मे ते ७ जूनदरम्यान विशेष ‘ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक’ घेण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

इंटरलॉकिंग व यार्ड रिमॉडेलिंगसाठी विशेष ब्लॉक

नागपूर-सेवाग्राम विभागात तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू असून सेवाग्राम स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करणे तसेच यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या अत्यावश्यक कामासाठी ३० मे ते ७ जून २०२६ या कालावधीत विशेष ‘ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक’ मंजूर करण्यात आला आहे. या काळात रेल्वे संचालनात मोठे बदल करण्यात आले असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

६ जून रोजी महत्त्वाच्या गाड्या पूर्णतः रद्द

६ जून २०२६ रोजी वर्धा-नागपूर मेमू (गाडी क्रमांक ६११०९) आणि नागपूर-वर्धा मेमू (६१११०) या लोकल सेवा पूर्णतः रद्द राहतील. तसेच अमरावती-अजनी एक्सप्रेस (१२२१९) आणि अजनी-अमरावती एक्सप्रेस (१२१२०) या महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्याही या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

थांबे रद्द, स्थानक बदल

३० मे ते ६ जूनदरम्यान हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (१२८१०) आणि नागपूर-वर्धा मेमू (६१११०) या गाड्यांचा सेवाग्राम स्थानकावरील थांबा रद्द करण्यात आला आहे. याशिवाय नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ बंद ठेवण्यात आल्याने कोचिंग परिचालनात बदल करण्यात आला असून एकूण प्रभावित कालावधी ६१ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ३० मे ते ७ जूनदरम्यान अतिरिक्त नऊ दिवस प्रवासी सेवांवर परिणाम राहणार आहे.

नागपूर-मडगाव एक्सप्रेसच्या संचालनात बदल

नागपूर-मडगाव एक्सप्रेस (११२०३) ही गाडी ३० मे ते ६ जूनदरम्यान अजनी स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. ही गाडी नागपूरहून दुपारी ३.०५ वाजता सुटते. त्याचप्रमाणे मडगाव-नागपूर एक्सप्रेस (११२०४) ही गाडी ३१ मे ते ७ जूनदरम्यान अजनी स्थानकावरून शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार आहे. ही गाडी रात्री ९.३० वाजता नागपूरला पोहोचते. या बदलांमुळे नागपूर रेल्वे स्थानकावरील प्रवासी व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.