• नागपूरहून दुरान्तो रवाना
  • चवथ्या दिवशी १५ गाडय़ा रद्द

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरान्तो एक्स्प्रेसला गेल्या मंगळवारी अपघात झाल्यानंतर या मार्गावरील विस्कळीत झालेली रेल्वेसेवा अद्याप रुळावर आलेली नाही. मात्र, आज नागपूरहून मुंबईकडे दुरान्तो एक्सप्रेस रवाना करण्यात आली, परंतु मुंबईकडून अद्याप दुरान्तो सोडण्यात आली नाही. दुसरीकडे आज चौथ्या दिवशी तब्बल १५ रेल्वागाडय़ा रद्द करण्यात आल्याने प्रवासाचे नियोजन बिघडल्याने प्रवाशांना मन:स्ताप होत आहे.

रेल्वे अपघातानंतर नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाचे दुरुस्ती काम अंतिम टप्प्यात असून वाहतूक सुरू झाली आहे, परंतु अजूनही वाहतूक पूर्ववत झालेली नाही. दरम्यान, आज अपघातानंतर पहिल्यांदाच नागपूरहून दुरान्तो एक्सप्रेस सोडण्यात आली. मात्र, मुंबईकडून दुरान्तो सोडायला डबे उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी एकच दुरान्तो ही गाडी दोन्ही बाजूने धावणार आहे. दरम्यान, दुरान्तो एक्सप्रेस दोन्ही बाजूने पूर्ववत केव्हा धावू शकेल. याबद्दल अजूनही नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना सुद्धा नीट माहिती नाही. विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस या मुंबई आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या गाडय़ा आजही रद्द करण्यात आल्या. तसेच मुंबई-हावडा या प्रसिद्ध मार्गावरील वाहतूक पुरती कोलमडली आहे.

नागपूर-मुंबई हा मार्ग सर्वाधिक व्यस्त म्हणून ओळखला जातो. अपघातामुळे वाहतूक विस्कळित झाल्याने अनेकांनी विमानाचा पर्याय निवडला. नागपुरातून रोज मुंबईत जाणाऱ्यांची संख्या हजारोंवर आहे. यात व्यावसायिकांपासून तर अधिकाऱ्यांपर्यत आणि राजकीय नेत्यांपासून तर इतर सामान्य नागरिकांपर्यंतचा समावेश आहे. रेल्वे वाहतूक अधिक काळ प्रलंबित असणे रेल्वेच्या उत्पन्नावरही परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. अपघातामुळे इतरही गाडय़ांना फटका बसल्याने संपूर्ण वेळापत्रकच कोलमडले आहे.

आज रद्द झालेल्या गाडय़ा

  • गोदिंया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
  • नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस
  • मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस
  • हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस
  • मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस
  • हावडा-मुंबई एक्स्प्रेस
  • शालिमार-मुंबई एक्स्प्रेस
  • मुंबई-शालिमार एक्सप्रेस
  • मुंबई-हावडा मेल
  • हावडा-मुंबई मेल
  • हावडा-मुंबई एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (३१ ऑगस्ट)
  • टाटानगर-मुंबई एलटीटी अंत्योदय एक्सप्रेस (३१ ऑगस्ट)
  • उद्या रद्द
  • मुंबई एलटीटी-हावडा
  • ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस
  • हावडा-मुंबई गीतांजली
  • शालिमार-मुंबई एक्स्प्रेस
  • हावडा-मुंबई मेल
  • हटिया-मुंबई एलटीटी एक्स्प्रेस
  • मुंबई एलटीटी-टाटानगर अंत्योदय एक्स्प्रेस

पुन:निर्धारित गाडी

३१ ऑगस्टला आपल्या निर्धारित वेळेत (२०.३५ वाजता) सुटणारी मुंबई एलटीटी-हावडा एक्सप्रेस १ नोव्हेंबरला पुन:निर्धारित वेळेत (७.५० वाजता) मुंबई एलटीटी येथून सुटेल.