नागपूर : महापालिकेत भाजप सत्तेत असून सत्ताधाऱ्यांमधील शीतयुद्धामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरुद्वाली मिरवणाऱ्या भाजपचेही कॉंग्रेसच्या पावलावर पाऊल दिसून येत आहे. पदाधिकारी व नगरसेवक तसेच पदाधिकारीविरुद्ध पदाधिकारी असे शीतयुद्ध सुरू असून त्याचा परिणाम शहरासंदर्भातील प्रस्तावावरही पडत आहे. या शीतयुद्धावर भाजपचे वरिष्ठ नेत्यांचे मौनावरही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

परिवहन समितीच्या बैठकीवर भाजपसह सर्वच सदस्यांचा बहिष्कार

मंगळवारी परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु भाजपसह सर्वच सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे ही बैठक रद्द करण्यात आली. सभापतींविरोधातील नाराजीतून सदस्यांनी बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याची चर्चा महापालिकेत रंगली. विशेष म्हणजे, अनुपस्थितांमध्ये सत्ताधारी सदस्यांचाही समावेश असल्याने अंतर्गत वादही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. बैठकीत परिवहन विभागाचा ‘देवदर्शन यात्रा बस सर्किट’चा प्रस्ताव चर्चेत येणार होता. या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर नागरिकांना शहरातील आणि शहराला लागून असलेल्या १५ प्रमुख धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देता येणार होती. याशिवाय परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढीचीही अपेक्षा होती. हा प्रस्तावही आता पुढील सभेत येण्याची शक्यता आहे. अर्थात शहरवासींना देण्यात येणाऱ्या सुविधांवर सत्ताधाऱ्यांमधील शीतयुद्धाचा परिणाम होताना दिसून येत आहे.

महापौरांना डावलून स्थायी समिती सभापतींकडून निमंत्रण

दरवर्षी शहरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत काढण्यात येते. मारबत उत्सव केवळ नागपुरात साजरा केला जातो. यंदा मारबत उत्सव महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणार आहे. या मारबत महोत्सवासाठी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी दिल्ली गाठून नेत्यांना निमंत्रण दिले. विशेष म्हणजे शहराचा मोठा कार्यक्रम व किंवा उत्सवाची निमंत्रण महापौरांनी देणे अपेक्षित होते. महापौर निता ठाकरे यांना डावलून दाणी यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मारबत उत्सवाचे निमंत्रण दिले. यात गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, खासदार विनोद तावडे यांना दाणी वखरे यांनी स्वतः महोत्सवासाठी निमंत्रित केले. यावरून आता पदाधिकाऱ्यांमध्येही धूसफूस सुरू झाली आहे.

क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतीही नेत्यांना निमंत्रणाबाबत अनभिज्ञ

विशेष म्हणजे मारबत महोत्सवाचे आयोजन महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने होत आहे. या विभागाकडून मारबत महोत्सवासाठी दोन कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती दर्शनी धवडही निमंत्रणाच्या प्रक्रियेत कुठेही दिसून न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किंबहुना त्यांना नेत्यांना निमंत्रणाबाबत काहीच माहित नसल्याचे समितीतील सदस्यांनी नमुद केेले. याबाबत दर्शनी धवड यांना विचारले असता त्यांनी मारबत महोत्सवाच्या नियोजनासंबंधी अनेक कामे सुरू असून त्यात मी व्यस्त आहे. परंतु महापालिकेचे एक प्रतिनिधी म्हणून कुणीतरी गेले, याचे समाधान असल्याचे पारंपरिक उत्तर दिले. यावरून त्याही नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.