नागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवाणी दानी यांनी अर्थसंकल्पासाठी तयार केली. नागरिकांकडून मते मागवून त्यांनी अनेक नवीन योजना, उत्पन्न वाढीचे स्त्रोतासह विकास कामांचा अर्थसंकल्पात समावेश केला. परंतु आज मंगळवारी महापालिकेच्या विशेष सभेत स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांना अर्थसंकल्प सादर करता आला नाही.

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सभा सुरू होताच महापौर निता ठाकरे यांनी ती तहकूब केली. त्यामुळे आता तयार केलेला अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटणार नाही, याची काळजी सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. सभागृह तहकूब करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता कारणीभूत ठरली. काल, सोमवारी निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर केल्यानंतर आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे स्थायी समिती सभापतींपुढे अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याबाबत मोठा पेच निर्माण झाला.

महापालिका आयुक्तांनी कालच तडकाफडकी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला परवानगीसाठी पत्र दिले. आज, मंगळवारी सकाळपर्यंत निवडणूक आयोगाची परवानगी मिळेल, या आशेवर सभेचे नियोजन कायम ठेवण्यात आले. सर्व सदस्य महापालिकेच्या सभेसाठी सुरेश भट सभागृहात पोहोचले. सभा सुरू होताच महापौर निता ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य सस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून अर्थसंकल्प सादर करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली असल्याचे सांगितले.

परवानगी मिळेपर्यंत सभा तहकूब करण्यात येत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. विशेष म्हणजे नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील मतदार आहेत. अर्थसंकल्पातून नगरसेवकांना निधी किंवा काही योजनांच्या समावेशाची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी मिळणे अशक्य असल्याचे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे तयार केलेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर अर्थात २२ जूननंतरच सभागृहात सादर होण्याची शक्यता आहे.

उत्साहावर विरजण

मार्चमध्ये आयुक्तांनी अर्थसंकल्प दिल्यानंतर दोन महिन्यांपासून त्यात सुधारणा करून सभागृहात मांडण्याची तयारी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी केली होती. महापालिका सचिवालयाने अर्थसंकल्पासाठी आज १९ मे रोजीचा दिवस निश्चित केला होता. २०२१ तत्कालीन सभापती प्रकाश भोयर यांनी सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर पाच वर्षानंतर सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने आणि तो सादर करण्याची संधी मिळाल्याने दाणी उत्सुक होत्या. परंतु त्यांच्या व सत्ताधाऱ्यांच्या उत्साहावर विरजन पडले.