नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीचा बहुप्रतिक्षित अर्थसंकल्प शनिवारी सभापती शिवानी दाणी यांनी सादर केला. त्यांनी ६२०२ कोटींचा अर्थसंकल्प मांडत शहराच्या सर्वांगिण विकासासोबत डकटिंग पॉलिसीअंतर्गत उत्पन्न वाढीवरही भर दिला. अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या गेल्या २० वर्षांतील पहिल्या महिला सभापती ठरल्या. यापूर्वी २००६ मध्ये २००६-०७ या वर्षांसाठी नंदिनी हाडके यांनी अर्थसंकल्प सादर केला.
स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी शहराला काय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पथदिवे यासाठी एकूण ६२०२. ४८ कोटींच्या अंदाजपत्रकातून नागपूरकरांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प केला. सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प पाच वर्षांनी सादर करण्यात आला.
सभापती शिवानी दाणी यांनी १९ मे रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची तयार केली होती. परंतु १८ मे रोजी निवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे महापौर नीता ठाकरे यांनी अर्थसंकल्पासाठी आयोजित विशेष सभा अर्थसंकल्प न मांडताच अनिश्चित काळासाठी तहकूब केली होती. ही सभा आज, शनिवारी सुरेश भट सभागृहात पार पडली. सभागृहात नगरसेवकांना ओळखपत्र बघून प्रवेश देण्यात आला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी ५८४० कोटी ६५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. यात सुधारणा करीत २०२६-२७ या वर्षांसाठी शिवानी दाणी यांनी आज अर्थसंकल्प सादर केला.
पाच वर्षानंतर सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प
पाच वर्षापूर्वी तत्कालीन स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी २०२१ मध्ये २०२१-२२ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला होता, त्यानंतर २०२२ मध्ये महापालिकेत प्रशासकराज आले. तेव्हापासून २०२५ पर्यंत आयुक्तच अर्थसंकल्प सादर करीत होते. यावेळी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या अर्थसंकल्पाकडे नागपूरकरांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही लक्ष लागले होते. दाणी यांचा अर्थशास्त्र हा आवडता विषय आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच अपेक्षित उत्पन्नातून शहराचा विकास साध्य करण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.
दाणी पाचव्या महिला स्थायी समिती सभापती
स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून ताराबाई मेश्राम यांनी १९७८ मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर आभा चतुर्वेदी यांनी १९९४, आभा पांडे यांनी २००५ मध्ये, नंदिनी हाडके यांनी २००६ मध्ये अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेच्या इतिहासात शिवानी दाणी पाचव्या महिला स्थायी समिती सभापती ठरल्या.
