नागपूर : महापालिकेची सात माळ्याची छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत सोमवारी दुपारी चांगलीच चर्चेत आली. सर्वत्र सीसीटीव्हीची नजर व सुरक्षा रक्षकांचा पहारा भेदून आजपर्यंत कधीच घडले नाही, ते पुढे आल्याने महापौर, आयुक्त व इतर पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

नेमके काय घडले?

महापालिकेत दररोज नागरिक विविध कामानिमित्त येतात. अशाच प्रकारे सामाजिक कार्यकर्ते सचिन खोब्रागडे प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळ्यावर असलेल्या उद्यान विभागात कामासाठी आले होते. त्यांना फोनवर बोलायचे असल्याने ते गॅलरीत आले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी चित्रफित तयार केली, फोटो काढले. आयुक्तांना पाठवले. ही चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली आणि नागरिकांत महापालिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले

काय आढळले सहाव्या माळ्यावर?

सामाजिक कार्यकर्ते खोब्रागडे यांना ज्याप्रमाणे धक्का बसला, तसाच धक्का आयुक्त, महापौरांनाही बसला.
सहाव्या मजल्यावर मद्याच्या रिकाम्या बाटल्या, काचेचे ग्लास, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे सापडल्याने प्रशासकीय इमारतीत पार्ट्या रंगत असल्याचे अधोरेखित होत असून सुरक्षेलाही सुुरुंग लागल्याचे दिसून येत आहे. सात मजली प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर महत्त्वाचे विभाग आहे. याच मजल्यावर आपत्कालीन मार्ग असून मोठी गॅलरी आहे. गॅलरीमध्ये पाऊल टाकले असता खोब्रागडे यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या आढळल्या. एवढेच नव्हे तिथे काचेचे दोन ग्लास, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे सापडले.

महापालिकेचे कर्मचारी की बाहेरील असामाजिक तत्व?

अत्यंत संवेदनशील विभाग असलेल्या मजल्यावर मद्याच्या बाटल्या घेऊन कोण पोहोचले, कार्यालयीन वेळेनंतर मुख्यालयाच्या आत मद्यपान करणारे महापालिकेचे कर्मचारी होते की बाहेरचे लोक, ‘सीसीटीव्ही’ची पाळत तसेच इमारतीवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून ते कसे निसटले, हा संशोधनाचा भाग ठरला आहे.

आयुक्त संतापले, स्वच्छतेचे निर्देश

खोब्रागडे यांनी येथील चित्रफीत आणि छायाचित्रे काढून ते महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांना पाठवले. ते पाहून आयुक्त चांगलेच संतापले. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना जागा स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. हा प्रकार अधिक चर्चेत येण्यापूर्वीच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तातडीने कचरा उचलला आणि गॅलरी स्वच्छ केली.

दररोज रंगते पार्टी?

येथे आढळलेल्या मद्याच्या बाटल्यांपैकी काही जुन्या, तर काही एक-दोन दिवसांपूर्वीच येथे आणण्यात आल्याचे दिसते. काचेचे ग्लास स्वच्छ दिसून आल्याने येथे दररोज पार्टी रंगत असल्याची चर्चा रंगली आहे.

कारवाईची मागणी

माहिती तंत्रज्ञान आणि ‘कमांड अँड कंट्रोल’ सेंटरच्या जवळ मद्याच्या बाटल्या आढळल्यामुळे मुख्यालयातील प्रवेश नियंत्रण आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आयुक्तांनी संताप व्यक्त केला असला तरी ‘सीसीटीव्ही’ तपासून दोषींवर कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. महापालिकेचे कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.