नागपूर : नागपूर शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापनासाठी महापालिकेकडून देशातील पहिला ‘ड्राय डायजेशन’ आधारित कॉम्प्रेस बायोगॅस गॅस प्रकल्प उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातून दररोज २८ टन गॅस, १२० टन सेंद्रिय खत आणि दररोज सुमारे ४०० टन आरडीएफ तयार होईल, ज्याचा वापर सिमेंट कारखाने व इतर उद्योगांमध्ये इंधन म्हणून केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या प्रकल्पाची पाहणी केली आणि देशासाठी हा प्रकल्प आदर्श मॉडेल ठरणार असल्याचे सांगितले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी भांडेवाडी परिसरात नेदरलॅडच्या सुसबिडी कंपनीच्या सहकार्याने भांडेवाडीतील ३० एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. सध्या या प्रकल्पातून ४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर निता ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. पाहणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक करीत हा प्रकल्प नागपूरच्या पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी ठरणार असल्याचे सांगितले.
ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने सुरुवात
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ४०० टन, आणि ऑगस्ट २०२६ पर्यंत १२०० टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याची क्षमता हा प्रकल्प गाठणार आहे. ऑगस्ट महिन्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून उपयुक्त इंधन मिळवणे, हे या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे २८ टन गॅसची निर्मिती होणार आहे. दररोज सुमारे १२० दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती व ४०० टन आरडीएफ तयार होईल.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, हा प्रकल्प पूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून उभारण्यात आला आहे. यासाठी महानगरपालिकेला कचऱ्याची उचल करून प्रकल्पापर्यंत आणण्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. ही महानगरपालिकेला आर्थिक दिलासा देणारी बाब आहे. या प्रकल्पात तब्बल ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, हे मॉडेल संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार असल्याचे ते म्हणाले.
भांडेवाडीच्या दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका
वर्षानुवर्षे पूर्व नागपूरच्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेला भांडेवाडी येथील कचऱ्याचे ढिगारे आणि त्यातून येणारी दुर्गंधी या प्रकल्पाच्या माध्यमातून आता इतिहासजमा होणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत या परिसरातील दुर्गंधीचा प्रश्न पूर्णपणे संपुष्टात येईल. वर्षभरात कचऱ्याचे सर्व ढिगारे नष्ट होऊन जमीन पूर्णपणे मोकळी होईल आणि पर्यावरणाची हानी टळणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे नागपूर शहर भविष्यात अधिक स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. प्रकल्पाविषयी माहिती देताना आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी पुढील दोन वर्षात डम्पिंग मुक्त शहर करण्याचा मानस असल्याचे सांगितले. महापौर निता ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याशी प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा केली.
