नागपूर : महाराष्ट्रातील अनेक भागांना दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असून, पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. अल्प पाऊस आणि भूगर्भातील पाण्याची घटती पातळी यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरही अपवाद नाही. त्यामुळे महापालिकेने या परिस्थितीवर मात करण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन स्वरूपाच्या उपाययोजनांवर महापौरांच्या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेण्यात आली.

महापौरांनी दिले कोणते निर्देश?

मागील वर्षीच्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी येथील जलाशयात कमी जलसाठा आहे. याशिवाय अलनिनोचा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत तीव्र राहणार आहे. दीर्घकालीन पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करीत महापालिकेकडून जनजागृती केली जाणार आहे. महापौर निता ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेतली.

बैठकीत सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, जलप्रदाय समितीचे उपसभापती पिंटू झलके, आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह जलप्रदाय, ओसीडब्ल्यू आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सध्याचा उपलब्ध पाणीसाठा शहराची किती काळ तहान भागवू शकेल, यावर चर्चा करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. पाण्याची उपलब्धता, सध्याच्या दैनंदिन कोट्यानुसार उपलब्ध साठा आणि परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, उपलब्ध पाणीसाठा पुढील वर्षापर्यंत पुरावा यासाठी आगामी काळात सध्याच्या परिस्थितीत काय बदल करावे लागतील, याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे महापौरांनी नमूद केले.

तूर्तास कपातीचा निर्णय नाही

सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि अपुऱ्या पावसाची शक्यता पाहता उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. पाणी बचतीला प्राधान्य देणे आवश्यक असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा यासाठी आवाहन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचा वापर काळजीपूर्वक न केल्यास उपलब्ध साठा वेगाने संपेल. पावसाची स्थिती कशी असू शकते आणि त्यानुसार कसे नियोजन करावे, यावरही चर्चा केली असून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, असे महापौरांनी सांगितले. पाणी कपात सध्या तरी केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

वाहने धुण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर

वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. वाहन धुण्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी वाहन धुण्यासाठी वापरल्यास पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल. यासाठी वाहन सेवा केंद्रे तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत विचार केला जात आहे. या माध्यमातून पाण्याची बचत करण्याबरोबरच सांडपाण्याचा पुनर्वापरही प्रभावीपणे करता येणार आहे.

पालकमंत्र्यांसोबत लवकरच बैठक

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दुष्काळी परिस्थितीचा आढावा दौरा सुरू आहे. त्यांच्यासोबत लवकरच संभाव्य पाणीटंचाई तसेच उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याचे महापौर ठाकरे यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचे नियोजन केवळ २०२७ पर्यंत मर्यादित न ठेवता पुढील दोन वर्षांसाठी रणनीती तयार करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.