नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर नागपूर महापालिका प्रशासन कामाला लागले असले, तरी ओबीसी आरक्षण आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत महापालिका प्रशासनाने थेट राज्य निवडणूक आयोग आणि महसूल खात्याकडे जबाबदारी ढकलल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिका केवळ अंमलबजावणी करणारी यंत्रणा असून निर्णय घेण्याचा अधिकार आयोग व महसूल विभागाकडेच असल्याचे स्पष्ट करत आयुक्तांनी प्रशासनाची भूमिका मांडली.

नागपूर महापालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीची माहिती देताना महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले की, महापालिका राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसारच काम करत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ज्या सूचना प्राप्त होतात, त्याची अंमलबजावणी करणे एवढेच आमच्या हातात आहे. मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी महसूल खात्यामार्फत भारतीय निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे मतदार यादीबाबतच्या तक्रारी सोडविण्यास महापालिका सक्षम प्राधिकरण नाही, असे त्यांनी सांगितले.

५४.३० टक्के आरक्षण आयोगाचा निर्णय

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत ५४.३० टक्के आरक्षण निश्चित झाल्याने ५० टक्क्यांच्या मर्यादेचा भंग झाल्याचा मुद्दा चर्चेत आहे. यासंदर्भात विचारले असता डॉ. चौधरी म्हणाले, आरक्षणाची सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसारच काढण्यात आली आहे. आयोगाकडून याबाबत कोणत्याही वेगळ्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून या निवडणुका घेतल्या जात असून या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगच न्यायालयात पक्षकार आहे, महापालिका नाही. त्यामुळे आयोग जी भूमिका घेईल, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

९५ हजार दुबार मतदारांवर उपाययोजना

शहराच्या मतदार यादीत सुमारे ९५ हजार दुबार मतदार आढळून आल्याचा मुद्दा देखील गंभीर आहे. याबाबत आयुक्त म्हणाले, मतदारांच्या छायाचित्रांच्या आधारे दुबार नोंदींची पडताळणी सुरू आहे. जे मतदार स्वतःहून दोन ठिकाणी नाव नोंद असल्याचे मान्य करतील, त्यांना फॉर्म भरून कोणत्याही एका ठिकाणी मतदान करण्याची मुभा दिली जाईल. तसेच दोन ठिकाणी नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर आल्यास त्याच्याकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

६३७ मतदार कसे वाढले?

महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप आणि अंतिम मतदार यादीत मतदारसंख्येत फरक दिसून आला आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीत प्रारूप यादीपेक्षा ६३७ मतदारांची वाढ झाली आहे. याबाबत डॉ. चौधरी म्हणाले की, प्रारूप मतदार यादी तयार करताना काही मतदारांची नोंद राहून गेली होती. त्यांची नावे अंतिम यादीत समावेश करण्यात आली आहेत.

एकूण प्रभाग ३८

  • सदस्य संख्या : १५१
  • मतदारांची संख्या : २४, ८३, ११२
  • पुरुष मतदार : १२,२६,६९०
  • महिला मतदार : १२,५६,१६६
  • तृतीयपंथी मतदार : २५६

प्रभाग क्रमांग १ मध्ये सर्वांधिक ४४ तृतीयपंथी मतदार