नागपूर : नागपुरातील शहरी भागात डेंग्यू, चिगनगुनिया आजाराने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश येत नसल्याने नागरिक बेजार झाले आहेत. दरम्यान, नागपूर महापालिकेकडून या आजारावर नियंत्रणासाठी आता नवीन नियोजन करण्यात आले असून त्याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते ३१ जुलै २०२४ दरम्यान शहरात डेंग्यूचे ४२३ तर चिकनगुनियाचे ४१४ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी डेंग्यूच्या ५१ तर चिकनगुनियाच्या ११८ रुग्णांना हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण हे शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या धरमपेठ व मंगळवारी झोनमध्ये नोंदवण्यात आले आहे. हेही वाचा.यवतमाळ : ‘आम्ही साऱ्या सावित्री’मधील ३३ चिमुकले चालविणार ‘बाल वाचनालय’ शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शहरातील रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. झोननिहाय आशा स्वयंसेविकाद्वारे सुरु असलेल्या सर्वेक्षण अभियानात आतापर्यंत ३२ हजार १२१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार झोननिहाय हे काम सुरू आहे. दरम्यान शनिवारी (३ ऑगस्ट) अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी धरमपेठ झोनमधील सर्वेक्षण कार्याची पाहणी केली. त्यांनी के. टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासोबत घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण कार्याचे निरीक्षण केले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा देवस्थळे उपस्थित होत्या. सातत्याने वाढणाऱ्या पावसामुळे किटकजन्य आजारात वाढ होत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्यासाठी आशा स्वयंसेविकांद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामध्ये आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन तापरुग्णांची माहिती घेतात. याशिवाय कंटेनर सर्वे अंतर्गत घरात आणि परिसरात पाणी जमा राहणाऱ्या वस्तूंची पाहणी केली जात आहे. साडेचार हजार डास उत्पत्ती केंद्र सापडले नागपूर महापालिकेच्या चमूने शुक्रवारपर्यंत (२ ऑगस्ट) दहाही झोनमधील ३२ हजार १२१ घरांचे सर्वेक्षण केले. या घरांमध्ये ४ हजार ५५७ दूषित भांडी आढळून आली. यात १ हजार २५४ कुलर, १४७ टायर, ९०० कुंड्या, ४९२ ड्रम, १६० मडके, १३३७ पक्षी व प्राण्यांची भांडी आणि २६७ इतर भांड्यांमध्ये डेंग्यूचा लारवा आढळला. लारवा आढळलेल्या ठिकाणी किटकनाशक औषध टाकण्यात आले. हेही वाचा.अमरावती : माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा… ‘तो’ विषाची बाटली घेऊन ‘तिच्या’ घरी पोहोचला अन्… काळजी घ्या, आजार टाळा- डॉ. सेलोकर नागरिकांनी घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुलर, कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे. आठवड्यात प्रत्येक शनिवारी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.