नागपूर: २०१० मध्ये तत्कालीन सरकारने अग्निशमन जवानांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा कल्याण निधी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. १५ वर्षांपूर्वी घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश मागील वर्षी काढण्यात आले. त्यानुसार प्रत्येक महापालिकांच्या अग्निशमन विभागाच्या एकूण उत्पन्नाचे ५ टक्के रक्कम महाराष्ट्र अग्निशमन सेवा कल्याण निधीत जमा करणे अपेक्षित आहे. नागपूर महापालिकेकडून ८५ लाख रुपये देण्यासाठी धनादेशही तयार केला आहे. नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे प्राण संकटात टाकणाऱ्या अग्निशमन जवान किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक कवच देण्यासाठी दीड दशक प्रतीक्षा करावी लागल्याने प्रशासनातील कासवगतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवितांना अग्निशमन विभागातील जवानांंचा कधी मृत्यू होतो तर कधी एखादा अवयव निकामी होतो. मार्च २०१० मध्ये राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिका, नगर पालिका, नगर पंचायत आदी अग्निशमन विभागात कार्यरत अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले किंवा गंभीर जखमी झाल्यास तत्काळ मदतीसाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा कल्याण निधीची स्थापना केली होती. या निधीत प्रत्येक महापालिका, नगर पालिका अग्निशमनच्या उत्पन्नापैकी ५ टक्के रक्कम जमा करावे असा आदेश आहे.
या कल्याण निधीची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे मागील वर्षात करण्यात आली. या निधीतून एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांपर्यंत कुटुंबीयांना तत्काळ देण्यात येणार आहे. याशिवाय गंभीर जखमी किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास ५ लाखांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे. ही रक्कम मंजूर करण्याचे अधिकार संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांच्याकडे राहणार आहे.
महापालिकेकडून धनादेश तयार
महापालिका, नगर पालिका अग्निशमनच्या उत्पन्नापैकी ५ टक्के रक्कम महाराष्ट्र अग्निशमन सेवा कल्याण निधीमध्ये जमा करावी लागणार आहे. मागील वर्षात महापालिकेच्या अग्निशमन विभागाला १७ कोटींचे उत्पन्न झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ८५ लाख देण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा प्रस्ताव लवकरच आयुक्तांकडे देण्यात आला होता. आयुक्तांनी यास मंजुरी दिली आहे.
महापालिकेने महाराष्ट्र अग्निशमन सेवा कल्याण निधीत ८५ लाख ६० हजार ९२५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा धनादेशही तयार झाला असून येत्या चार-पाच दिवसांत धनादेश संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
- तुषार बारहाते, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.
