नागपूर : महापौर निता ठाकरे यांच्यासह महापालिकेतील सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना महापालिकेच्या दहाही झोनच्या सहायक आयुक्तांनी नोटिशी बजावल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे घराच्या बांधकामाचा नकाशा सादर करण्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्याने काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामाबाबत सहानिशा करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने १२ डिसेबर २०२५ रोजी नवीन आदेश काढून नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात अनधिकृत बांधकाम केल्यास नगरसेवक म्हणून अपात्र ठरेल, असे नगरसेवकांना नमूद करण्यास सांगितले होते. त्यानुसार जानेवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत अर्ज दाखल करताना सर्वच कागदपत्रांसह उमेदवारांनी शपथपत्र सादर केले होते. जानेवारीतच अॅड. सुहास बिडकर यांनी महापालिकेला नोटीस देत याबाबत कायदेशीर नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी केली होती. मागील महिन्यात या पत्राची दखल घेत आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार उपायुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना पत्र दिले असून नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांनी महापौर निता ठाकरे व विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांना नोटीस बजावली. याशिवाय हनुमाननगर झोनने उपमहापौर लिला हाथीबेड, लकडगंज झोनच्या सहायक आयुक्तांनी सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांना नोटीस बजावली. केवळ यानांच नव्हे तर महापालिकेतील सर्व सभापती, नगरसेवकांनाही संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांनी नोटीस बजावल्याचे अॅड. बिडकर यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
लक्ष्मीनगर, आशीनगर व मंगळवारी झोनकडील पत्राची प्रत त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याची पुस्तीही बिडकर यांनी जोडली. सात दिवसांत इमारत बांधकामाचा मंजूर नकाशा सादर करण्यात यावा, असे नोटीसमध्ये नमूद आहे. या नोटीसला काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी अद्याप उत्तर दिले नाही.
‘महापालिकेने अनधिकृत बांधकामाची शहानिशा करावी’
महापालिकेने महापौरांसह सर्वच पदाधिकारी, नगरसेवकांना नोटीस बजावली. परंतु ही केवळ औपचारिकता ठरू नये. महापालिकेने सर्वच नगरसेवकांच्या बांधकामाबाबत शहानिशा करावी, अशी मागणी अॅड. बिडकर यांनी केली. नोटीस देऊन कारवाईस सुरुवात केल्याबाबत त्यांनी आयुक्तांचे कौतुक केले. शपथपत्रानुसार लोकप्रतिनिधींची माहिती पुढे यावी, कुणाशीही वैर नाही, असेही बिडकर म्हणाले.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे.-निर्भय जैन, उपायुक्त, महापालिका.
