नागपूर : महापौरपदाच्या नावावरून आता सारे तर्कवितर्क व चर्चांना विराम मिळाला असून दक्षिण नागपुरातील प्रभाग २८ मधील नगरसेविका निता ठाकरे यांची महापौरपदी निवड निश्चित झाली आहे. त्यांनी आज महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल झाले. त्यांच्यासोबत उपमहापौरपदासाठी ऐन वेळेवर लिला हाथीबेड यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौरपदासाठी निवडणूक येत्या ६ फेब्रुवारी रोजी सुरेश भट सभागृहात आयोजित पहिल्या विशेष सभेदरम्यान होणार आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात पार पडली. निता ठाकरे यांनी महापौरपदासाठी मनपा सचिवांकडे दोन नामांकन अर्ज दाखल केले. लिला हाथीबेड यांनीही उपमहापौरपदासाठी दोन अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना शहर भाजपाध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, गटनेते बाल्या बोरकर, नगरसेवक पिंटू झलके यांच्यासह इतर नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.
निता ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच त्या शहराच्या ५५ व्या व आठव्या महिला महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले. निता ठाकरे एमए बीएड झाल्या असून गृहिणी आहेत. त्या यापूर्वी २००२, २००७, २०१२ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. मागील २०१७ मधील निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता त्या प्रभाग २८ मधून निवडून आल्या.
याशिवाय त्यांनी भाजपच्या पदाधिकारी म्हणूनही विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. त्या महिला आयोगाच्या सदस्याही होत्या. त्यांच्या उमेदवारीसाठी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी आग्रह धरला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेत त्यांचे नाव अंतिम करण्यात आले. मात्र नावाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. आज अर्ज दाखल करण्यापर्यंत महापौरपदाच्या नावाबाबत साशंकता होती. दुपारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या शहराच्या महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले.
उपमहापौराची नाट्यमय निवड
उपमहापौरपदासाठी प्रभाग १९ मधील ज्येष्ठ नगरसेवक अॅड. संजय बालपांडे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांना उमेदवारी भरण्यास सांगण्यात आले. परंतु त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विनम्रतेने उपमहापौरपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन वेळेवर प्रभाग २९ मधील लिला हाथीबेड यांना तयार करण्यात आले. त्यामुळे आता दक्षिण नागपूरला महापौरपदासोबतच व उपमहापौरपदही देण्यात आले.
ठाकरेविरुद्ध ठाकरे लढत
कॉंग्रेसचे ३४ सदस्य असून महापौरपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसकडून सोमवारी प्रभाग ११ मधील स्नेहल ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता निता ठाकरेविरुद्ध स्नेहल ठाकरे अशी लढत राहणार आहे. कॉंग्रेसने उपमहापौरपदासाठी प्रभाग ९ मधील विवेक निकोसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

