नागपूर : नागपूर महापालिकेत सर्व समित्यांच्या सभापतीपदी नगरसेविकांची नियुक्ती करत भाजपने महिलाराज आणल्याचे अभिमानाने सांगितले. परंतु या महिला पदाधिकारी महिलांच्या रोजगारात अडथळा ठरताना दिसत आहे. महिलांच्या रोजगारावर टाच आणून महिला पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या रोजगारावर लक्ष केंद्रित केल्याची खमंग चर्चा महापालिकेत रंगली आहे.

कर देयके वाटपाचे काम बचत गटांना नव्हे तर ‘यांना’ देण्याचा आग्रह

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून यावर्षी दहाही झोनमध्ये कर देयके वाटपाचे काम महिला बचत गटांना देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. परंतु नुकत्याच झालेल्या एका बैठकीत एका महिला पदाधिकाऱ्यांनी महिला बचत गटाऐवजी एका खासगी एजन्सीला काम देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आता केवळ दोनच झोनमध्ये कर देयके वाटपाचे काम महिला बचत गटांना देण्याचे ठरले, असे सूत्राने नमूद केले. त्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांकडूनच महिलांवर अविश्वास दाखवला जात असल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.

काय झाले बैठकीत?

मालमत्ता कर समितीची बैठक नुकताच महापालिकेत पार पडली. यात मालमत्ता कर देयके वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. आधी ठरल्याप्रमाणे हे काम महिला बचत गटांना देण्याबाबत चर्चा झाली. परंतु सर्व दहाही झोनमध्ये महिला बचत गटांना काम देण्याऐवजी दहा एजन्सी नियुक्त करण्याबाबत एका महिला पदाधिकाऱ्यांने आग्रह धरला. एवढेच नव्हे तर एजन्सीला काम देण्याबाबत दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे महिला बचत गटांऐवजी एजन्सीलाच काम देण्याबाबत या महिला पदाधिकाऱ्याचा आग्रह का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने केवळ दोन झोनमध्ये महिला बचत गटाला काम देण्याचे व इतर झोनमध्ये एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे सूत्राने नमूद केले.

खाजगी एजन्सीला दर वाढवून देण्याचाही आग्रह

मागील वर्षी महापालिकेने पोस्टाद्वारे मालमत्ता कराचे देयके घरापर्यंत पोहोचवले. यासाठी प्रतिदेयके ३५.७७ रुपये दर देण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. ही सरकारी एजन्सी असल्याने दर अधिक होते. परंतु खाजगी एजन्सीला २८ रुपयांपर्यंत दर देण्याबाबत चर्चा झाली. परंतु या महिला पदाधिकाऱ्याने खाजगी एजन्सीला ४० रुपयांपर्यंत दर वाढवून देण्याची मागणी केल्याचे सूत्राने नमूद केले. एजन्सीबाबत पदाधिकाऱ्यांना एवढा पुळका का आला, अशी चर्चा अधिकाऱ्यांत रंगली आहे. विशेष म्हणजे दर वाढवून देण्याबाबत या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाचीही खमंग चर्चा आहे.

नाल्यात देयके फेकणाऱ्या एजन्सीसाठी आमदाराचा दबाव?

काही वर्षांपूर्वी मालमत्ता कराचे देयके घरोघरो पोहोचवण्यासाठी एका एजन्सीला काम देण्यात आले होते. यासाठी एजन्सीने बक्कळ रक्कमही महापालिकेकडून घेतली होती. परंतु या एजन्सीने मालमत्ता कराची देयके नागरिकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी चक्क नाल्यात फेकली होती. नंदनवन परिसरातील एका नाल्यात मालमत्ता कराची हजारो देयके आढळून आल्याने त्यावेळी खळबळ उडाली होती. या एजन्सीचा करार रद्द करून महापालिकेने पुन्हा कामे देणे बंद केले होते. परंतु ही एजन्सी आता पुन्हा महापालिकेतील देयके वितरणाचे काम मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. अधिकाऱ्यांनी हात झटकल्यामुळे या कंपनीच्या मालकाने एका आमदाराला हाताशी धरले आहे. या आमदारानेही या एजन्सीला काम देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचे सूत्राने नमूद केले.

झोननिहाय मालमत्ता

झोन – मालमत्तांची संख्या

लक्ष्मीनगर – ८००९३

धरमपेठ – ४५८०७

हनुमाननगर – ९३,७९४

धंतोली – २२,६९०

नेहरूनगर – १,११,३१३

गांधीबाग – २७,८७०

सतरंजीपुरा – ४२,५४९

लकडगंज – ८१,७९४

आशीनगर – १,२०,८९२

मंगळवारी – ७१,७०६