नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेत घेण्याचे आदेश दिले आहे. नागपूर महापालिकेतील आरक्षणाची मर्यादा ५४ टक्क्यांवर गेली असून यातून निवडून ओबीसी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे भाजपसह कॉंग्रेसच्या नगरसेवकांत धाकधुक वाढल्याचे चित्र आहे.
आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. करोनामुळे पुढे ढकलल्या गेलेल्या आणि मुदत संपलेल्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जवळपास साडेचार वर्षानंतर जानेवारीत पार पडल्या. मे २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी निवडणुका प्रथम प्राधान्य असून इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायांच्या समावेश किंवा वगळण्यासंबंधी कायद्यातील सुधारणा, वेळेनुसार विचारात घेतले जाऊ शकतात, असेही स्पष्ट केले होते.
नागपूर महापालिकेतही आरक्षण ५४ टक्क्यांवर गेले होते. याच स्थितीत महापालिकेने ३८ प्रभागांतील १५१ नगरसेवकांसाठी आरक्षण काढले होेते. त्यानुसार ओबीसींसाठी ४० जागा, अनुसूचित जमातींसाठी १२, अनुसूचित जातीसाठी ३० जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गात ६९ जागा आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २० जिल्हा परिषद व २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका आरक्षण मर्यादेत ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश गुरुवारी दिले. यामुळे महापालिकेतील ५४ टक्क्यांवर गेलेले आरक्षण मर्यादेत आणण्याच्या हालचाली होऊ शकतात. परिणामी महापालिकेतील ४० ओबीसी नगरसेवकांत कुजबूज सुरू झाली असून त्यांच्यात भितीचे वातावरण आहे.
असे आहे प्रकरण
नागपूर महापालिकेच्या जानेवारीत पार पडलेल्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे निवडून आलेल्या ४० ओबीसी नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्देशामुळे सर्वोच्च न्यायालयाच्याच जुन्या निकालांचा संदर्भ घेतला गेल्यास या जागांवर पोटनिवडणुका होणार की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरक्षणाची मर्यादा आणि पेच
महापालिकेत ओबीसी प्रवर्गातून ४० नगरसेवक निवडून आले आहेत. पण आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या एकूण आरक्षणाच्या टक्केवारीच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि जे. के. माहेश्वर यांच्या खंडपीठाने घेतलेल्या निकालाचा आधार घेतल्यास आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या जागांवरील निवडणुका रद्द होऊ शकतात. असे झाल्यास नागपूर आणि चंद्रपूमधील समीकरणेही पूर्णपणे बदलू शकतात.
