नागपूर : ओबीसी आरक्षणावरून नेहमीच सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. नागपूर महापालिकेतील आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याने ओबीसी नगरसेवकांवर टांगती तलवार आहे. नगरसेवक अपात्र ठरल्यास पुन्हा नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नीता ठाकरे यांची महापौरपदी निवड करून ओबीसींना चुचकारण्याची भाजपची खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान दक्षिण नागपुरातील प्रभाग २८ मधील नगरसेविका नीता ठाकरे यांची महापौरपदी निवड निश्चित झाली आहे. त्यांच्यासोबत उपमहापौरपदासाठी ऐनवेळेवर लीला हाथीबेड यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवानी दाणी यांची निवड पक्की असल्याचे पक्षातील नगरसेवकांनी कपाळावर आठ्या आणत सांगितले. दाणी या प्रथमच निवडून आल्या असून थेट महापालिकेची तिजोरी त्यांच्या स्वाधीन केली जाणार असल्याने महापालिकेत खऱ्या अर्थाने जिजाऊ अन सावित्रींच्या लेकींचे राज राहणार आहेत.
महापौरपदासाठी निवडणूक येत्या ६ फेब्रुवारी रोजी सुरेश भट सभागृहात आयोजित पहिल्या विशेष सभेदरम्यान होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात पार पडली. नीता ठाकरे यांनी महापौरपदासाठी महापालिका सचिवांकडे दोन नामांकन अर्ज दाखल केले. लीला हाथीबेड यांनीही उपमहापौरपदासाठी दोन अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना शहर भाजपाध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, गटनेते बाल्या बोरकर, नगरसेवक पिंटू झलके यांच्यासह इतर नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते. नीता ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच त्या शहराच्या ५५ व्या व आठव्या महिला महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले. नीता ठाकरे एम.ए. बी.एड. झाल्या असून गृहिणी आहेत. त्या यापूर्वी २००२, २००७, २०१२ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. मागील २०१७ मधील निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता त्या प्रभाग २८ मधून निवडून आल्या. याशिवाय त्यांनी भाजपच्या पदाधिकारी म्हणूनही विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. त्या महिला आयोगाच्या सदस्याही होत्या. त्यांच्या उमेदवारीसाठी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी आग्रह धरला होता.
मागील आठवड्यात शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेत त्यांचे नाव अंतिम करण्यात आले. मात्र, नावाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. आज अर्ज दाखल करण्यापर्यंत महापौरपदाच्या नावाबाबत साशंकता होती. दुपारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या शहराच्या महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले.
उपमहापौरपदासाठी नाट्यमय घडामोडी
उपमहापौरपदासाठी प्रभाग १९ मधील ज्येष्ठ नगरसेवक ॲड. संजय बालपांडे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांना उमेदवारी भरण्यास सांगण्यात आले. परंतु, त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विनम्रतेने उपमहापौरपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन वेळेवर प्रभाग २९ मधील लीला हाथीबेड यांना तयार करण्यात आले. त्यामुळे आता दक्षिण नागपूरला महापौरपदासोबतच व उपमहापौरपदही देण्यात आले.
सव्वा-सव्वा वर्षाचे महापौरपद?
महापालिकेत १०२ नगरसेवक निवडून आले. यातील प्रमुख नगरसेवकांना पुढील पाच वर्षे महत्त्वाची पदे देण्यात येणार आहेत. महापौरपदासाठी अनेक दावेदार असून सर्वच मतदारसंघांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी महापौरपद सव्वा-सव्वा वर्षाचे राहणार असल्याची चर्चाही रंगली आहे. याबाबत भाजपने अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. परंतु सर्वांना न्याय देण्यासाठी या प्रयोगाची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी मागील सत्ताकाळात हा प्रयोग करण्यात आला होता.
ठाकरेविरुद्ध ठाकरे लढत
काँग्रेसचे ३४ सदस्य असून महापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडून सोमवारी प्रभाग ११ मधील स्नेहल ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता नीता ठाकरे विरुद्ध स्नेहल ठाकरे अशी लढत राहणार आहे. काँग्रेसने उपमहापौरपदासाठी प्रभाग ९ मधील विवेक निकोसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर, सरस्वती सलामे, मंजू चाचेरकर, प्रमोद ठाकूर उपस्थित होते.
विभागीय कार्यालयात भाजपची गट नोंदणी
महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपचे गटनेते बाल्या बोरकर यांनी विभागीय कार्यालयात सकाळी भाजप गटाची नोंदणी केली. यावेळी विभागीय आयुक्तांनी प्रत्येक नगरसेवकांची प्रत्यक्ष भेट घेतली. गट नोंदणी करताना शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, नगरसेवक विकी कुकरेजा उपस्थित होते.

