नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या नगरसेविकडे देण्यात आल्या. स्थायी समिती सदस्यांची नावे घोषित करताना महापौर निता ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या शिवानी दाणी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर पुकारले. त्यानुसार शिवानी दाणी या नागपूर महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा असतील. निवडून आल्यापासून शिवानी दाणी यांना महत्वाचे पद देण्यात येईल, अशी चर्चा होती. महापौरपदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा होती.
महापालिकेची विशेष सभा मंगळवारी सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली. यात स्थायी समिती सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात शिवानी दाणी यांचे नव सर्वप्रथम पुकारण्यात आले. परंपरेनुसार प्रथम नाव संबंधित समितीच्या सभापतीचे नाव असते. शिवानी दाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील प्रभाग ३६ मधून सर्वसाधारण गटातून निवडून आल्या आहेत. दाणी यांच्याशिवाय स्वीटी भिसीकर, प्रमिला गौर, विशाखा मोहोड, ममता ठाकूर, साधना बरडे, राजगिरे, मानसी सिमले यांचा भाजपने समावेश केला आहे.
काँग्रेसतर्फे अभिजित झां, अभिषेक शंभरकर, मॅरिस्टेला उसरे, मुस्लिम लीग व बहुजन आघाडीतर्फे अस्लम खान यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व सभापतीपदी नगरसेविकांची वर्णी लागली आहे. यात परिवहन समिती सभापतीपदी मंगला खेकरे, स्थापत्य समिती सभापती अश्विनी जिचकार, आरोग्य समिती मनीषा अतकरे, विधी समिती सभापती निधी तेलगोटे, शिक्षण- संतोषदेवी लद्ढा, गलिच्छ वस्ती कृतिका मसराम, महिला व बालकल्याण सारिका नांदुरकर, जलप्रदाय दिव्या धुरडे, कर आकारणी सरिता कावरे, अग्निशमन व विद्युत समिती सभापती माया इवनाते यांची वर्णी लागली आहे.
सभापतींचा पदग्रहण सोहळा येत्या ८ मार्च रोजी अर्थात महिली दिनी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे नागपूर महापालिकेसाठी हा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. भाजपने सर्व समित्यांवर महिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत एकप्रकारे महापालिकेचे संपूर्ण नियंत्रण महिलांच्या हाती देत महिला सक्षमीकरणाचा एक संदेश दिला.
नागपूर ठरली पहिली महापालिका
झोनच्या सभापतीपदीही महिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. झोन सभापतीपदाची निवडणूक येणाऱ्या काही दिवसात होणार असून भाजपचे झोननिहाय संख्याबळ बघता १० पैकी ९ झोनमध्ये त्यांचेच सभापती होण्याची शक्यता आहे. झोन सभापती, विषय समिती व महापौर, उपमहापौरपदीही महिलाच असलेली नागपूर देशातील पहिली महापालिका ठरण्याची शक्यता आहे.
भाजप शहराध्यक्ष तिवारी यांनी समित्यांवर सभापती नगरसेविकाच राहणार असल्याची घोषणा केली. झोन सभापतीपदाची निवडणूक महिला दिनापूर्वी व्हावी व ८ मार्चला सर्व महिला सभापतींचा ऐतिहासिक सोहळा व्हावा, यासाठी प्रयत्न नक्कीच करणार आहे.
- नीता ठाकरे, महापौर.
